अमेरिकेत भारतीय ड्रग्ज तस्कराची हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली

अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर सुनील यादव याची लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई
Published on

कॅलिफॉर्निया : अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर सुनील यादव याची लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे दोन दिवसांपूर्वी यादव याची हत्या करण्यात आली असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

स्टॉकटोन भागातील घरात घुसून यादव याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी अमेरिकास्थित गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्रारच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, सर्व भावांसाठी, मी, रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार, कॅलिफोर्नियामध्ये सुनील यादव उर्फ गोलीच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आमचा भाऊ अंकित भादू याला चकमकीत ठार करण्यासाठी त्याने पंजाब पोलि‍सांशी हा‍तमिळवणी केली. आम्ही त्याच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.

ब्रार याच्याकडून ज्या घरात यादव याची हत्या करण्यात आली त्या घराचा नंबर ६७०६ असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये पुढे, सुनील यादव हा अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेला होता, तसेच पंजाब, हरयाणा आणि राजस्थान येथे अमली पदार्थांचा पुरवठा करणे आणि पोलि‍सांशी संबंध असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच अंकित भादू चकमक प्रकरणात त्याचा सहभाग उघड झाल्यानंतर तो अमेरिकेत पळून गेल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

आमच्या सर्व शत्रूंनी तयार राहावे, तुम्हा जागात कुठेही असाल तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचू, असा इशाराही या फेसबुक पोस्टमध्ये देण्यात आला आहे. दुबईपासून ते अमेरिकेपर्यंत सुनील यादव हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थ तस्करीमध्ये सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. तो मूळचा पंजाबमधील अबोहार, फाजिल्का येथील आहे. दोन वर्षांपूर्वी राहुल नावाने पासपोर्ट मिळवून प्रशासनाला गुंगारा देत अमेरिकेत पळून जाण्यात यशस्वी झाला होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दुबईतील प्रशासनाने काही साथीदारांना अटक केल्यानंतर ताबडतोब राजस्थान पोलिसांनी यादवविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in