भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीच्या जवळ ४ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा केला पार

भारताने १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता हा चार ट्रिलीयन डॉलर्सचा आकडा पार केला. आता भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या जवळ पोहोचला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीच्या जवळ ४ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा केला पार

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार पहिल्यांदाच ४ ट्रिलीयन डॉलर्सच्या वर गेला आहे. यामुळे भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या जवळ पोहोचला आहे. ५ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या लक्ष्याचे दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे.

भारताने १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता हा चार ट्रिलीयन डॉलर्सचा आकडा पार केला. आता भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या जवळ पोहोचला आहे. चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे. भारत व जर्मनीच्या जीडीपीत फारच कमी अंतर राहिले आहे.

अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तिचा आकार २६.७ ट्रिलीयन डॉलर आहे. त्यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनचा आकार १९.२४ लाख ट्रिलीयन डॉलर आहे. जपान तिसऱ्या क्रमांकावर असून तिचा आकार ४.३९ ट्रिलीयन डॉलर्स तर जर्मनी ४.२८ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असून ती चौथ्या क्रमांकावर आहे.

२०२७ पर्यंत ५ ट्रिलीयन डॉलर्सचे लक्ष्य

भारत सरकारने देशाला ५ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा आराखडा तयार केला. ४ लाख ट्रिलीयन डॉलर्स ही महत्वपूर्ण कामगिरी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, भारत २०२७ पर्यंत जपान व जर्मनी यांना पाठी टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारताचा जीडीपी ५ ट्रिलीयन डॉलर्सपेक्षा अधिक बनेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही याच अंदाज व्यक्त केला आहे.

इंग्लंड-फ्रान्सला मागे टाकले

भारताने गेल्यावर्षी ब्रिटन व फ्रान्सला जीडीपीच्या बाबत मागे टाकले. भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. भारताचा आर्थिक वृद्धीदर जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.८ टक्के राहिला. तत्पूर्वी गेल्यावर्षी भारताचा विकास दर ७.२ टक्के राहिला होता.

सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर ६.५ टक्के राहणार आहे. भारताची अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत ६.५ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के तर चौथ्या तिमाहीत ५.७ टक्के दराने वाढेल. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, भारताची अर्थव्यवस्था २०२३ व २०२४ ६.३ टक्के दराने वाढेल. याचाच अर्थ येते काही वर्षे भारत हीच जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in