मॉस्कोतील भारतीय कर्मचाऱ्याला अटक, पाकसाठी हेरगिरी

भारताच्या मॉस्कोतील दूतावासात कार्यरत असलेल्या सतेंद्र सिवल (वय २७) नावाच्या कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी अटक केली आहे.
मॉस्कोतील भारतीय कर्मचाऱ्याला अटक, पाकसाठी हेरगिरी
Published on

लखनऊ : भारताच्या मॉस्कोतील दूतावासात कार्यरत असलेल्या सतेंद्र सिवल (वय २७) नावाच्या कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी अटक केली आहे. सिवल पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तहेर संघटनेसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सतेंद्र सिवल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या हापूर येथील रहिवासी असून, तो २०२१ सालापासून रशियातील मॉस्को येथे भारतीय दूतावासात इंडिया बेस्ड सिक्युरिटी असिस्टंट या पदावर कार्यरत होता. तो भारताच्या संरक्षण दलांसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता. भारतीय अधिकाऱ्यांना त्याच्या कारवायांबद्दल संशय आल्याने त्याच्यावर गेले सहा महिने पाळत ठेवण्यात आली होती. तो सध्या मॉस्को दूतावासातून रजा घेऊन भारतात आला आहे. उत्तर प्रदेशच्या हापूर या गावी पोहोचताच एटीएसने त्याला अटक केली. त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून अधिक चौकशी केली जात आहे. एटीएसचे अधिकारी त्याच्या बँक खात्यांचाही तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in