नवी दिल्ली : विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या भारतभूमीवर अनेक जाती, समाज, धर्म, कुळ आणि विविध वेशभूषा परिधान करणारे लोक राहतात. या देशाने हजारो संस्कृतींना एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवले आहे. येथे अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदत असले तरी धर्मनिरपेक्ष ही भारताची जगात ओळख आहे. जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील बलाढ्य देशांच्या नेत्यांना याचे दर्शन घडत आहे. २० देशांतील परदेशी पाहुणे नवी दिल्लीत यानिमित्ताने आले आहेत. भारतीय परंपरेनुसार या पाहुण्यांचे स्वागत केले जात आहे. त्यांच्यासाठी जेवणाचे खास नियोजन करण्यात आले आहे. त्यात भारतातील स्वादिष्ट्य व्यंजनांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक जागतिक नेते दिल्लीच्या भारत मंडपममध्ये जी-२० शिखर परिषदेसाठी एकत्र आले आहेत, त्यांना जेवणात शनिवारी बाजरीपासून तयार केलेले स्वादिष्ट भारतीय पदार्थ दिले गेले. दर ५० किलोमीटरवर चव आणि पाककृती बदलणारा देश म्हणूनही भारताची ओळख आहे. एक, दोन किंवा मूठभर पदार्थांमधून भारताचे प्रतिनिधित्व करणे शक्य नाही. म्हणूनच नवी दिल्लीतील ताज पॅलेसमधील १२० शेफच्या टीमने राजधानीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेसाठी सुमारे ५०० पदार्थ तयार केले आहेत. यंदा जग भरड धान्य वर्ष साजरा करत आहे. त्यामुळे गहू, भातऐवजी भरड धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांवर अधिक भर देण्यात आला आहे.
महाराष्ट्रीयन थाळी
''जी-२० साठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या जेवणातील पदार्थांसाठी आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून तयारी केली आहे. देशातील खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ताजच्या मेनूमध्ये गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील थाळीचा समावेश आहे. प्रत्येक थाळीमध्ये १२ पदार्थ आहेत, तर 'हाय टी'च्या मेनूमध्ये दिल्लीचा चाट, महाराष्ट्राची पावभाजी आणि तामिळनाडूची पाणीराम यासह देशभरातील स्ट्रीट फूड समाविष्ट आहे.''
शेफ सुरेंद्र नेगी, ताज पॅलेस, नवी दिल्ली
बाजरी मिठाई
''आम्ही फॉक्सटेल बाजरी, नाचणी, ज्वारीचे चॉकलेट बार तयार केले आहेत. ते पीठविरहित आणि साखरमुक्त आहेत. या मिठाई मुख्यतः त्यांच्या खोलीत ठेवल्या जातात किंवा संस्मरणीय राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना स्वागत किट म्हणून भेट दिल्या जातात.''
शेफ अॅस्टिक ओबेरॉय, लीला पॅलेस, नवी दिल्ली
जी-२० नेत्यांना बाजरीशी संबंधित भारतीय खाद्यपदार्थ देण्याचे पाऊल केवळ भारताचा समृद्ध पाककृती वारसा दर्शवत नाही तर शिखर परिषदेच्या एकता आणि सामायिक भविष्याच्या थीमशी देखील सुसंगत आहे. जी-२० शिखर परिषदेची थीमच वसुधैव् कुटुंबकम् (एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य) आहे.
मुक्तेश परदेशी, विशेष सचिव, जी-२० शिखर परिषद