

मुंबई : भारतीय जवानांनी पाकिस्तानची 'अल मदिना' ही बोट ताब्यात घेतली असून या बोटीतून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या तयारीत असणाऱ्या ९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यामुळे पाककडून पुन्हा एकदा समुद्रमार्गे भारतात येऊन काही दहशतवादी कारवाया करण्याचा डाव भारतीय लष्कराने उधळून लावला आहे.
भारतीय तटरक्षक दलाने मध्यरात्री पाकिस्तानची ‘अल मदिना’ नावाची बोट पकडली असून त्यातील ९ जणांना अटक केली आहे. या सर्व संशयितांना गुजरातच्या पोरबंदर येथे आणण्यात आले आहे.
संशयितांची चौकशी सुरू
भारतीय लष्कराने तत्काळ कारवाई करून आपली समुद्र सीमा आता सर्वसाधारण नाही, हे दाखवून दिले आहे. अरबी समुद्रात १४ जानेवारीच्या मध्यरात्री भारतीय तटरक्षक दलाची बोट पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी, समुद्र तटावर एक संशयित हालचाल दिसून आल्याने लष्कराने गंभीर दखल घेऊन पाठलाग केला. आंतरराष्ट्रीय समुद्र सीमा रेषेवर भारतीय हद्दीत एक बोट शांतपणे पुढे जात होती. ही केवळ मच्छिमार करणारी बोट नव्हती, तर त्यातील सर्वांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे, भारतीय नौदलाची बोट त्या दिशेने कूच करताच, पाकिस्तानी बोटीने आपला स्पीड वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटरक्षक दलाच्या जवानांनी या बोटीला घेरले व ९ जणांच्या मुसक्या आवळल्या.या बोटीसह संशयित ९ जणांना पोरबंदर येथील सीमा रेषेवर आणण्यात आले असून भारतीय सुरक्षा यंत्रणानी म्हणजेच आयबी, रॉ आणि एटीएसनेही या बोटीतील संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे.