Operation Dost : तुर्कस्थान भूकंप: काय आहे भारताचे 'ऑपरेशन दोस्त'?

तुर्कस्थान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारतीय सरकारने राबविले 'ऑपरेशन दोस्त' (Operation Dost)
Operation Dost : तुर्कस्थान भूकंप: काय आहे भारताचे 'ऑपरेशन दोस्त'?

काही दिवसांपूर्वी तुर्कस्थान भीषण भूकंपाने हादरले. हा भूकंप इतका भयंकर होता की अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. हजारो कुटुंब रस्त्यावर आली. काहींची घरे जमीनदोस्त झाली तर अनेक जणांचे जीवन उद्ध्वस्त झाले. अद्यापही अनेक कुटुंब ही ढिगाऱ्यामध्ये अडकलेली आहेत. त्यांच्या मदतीसाठी भारत सरकार धावून गेले असून त्यांच्यासाठी 'ऑपरेशन दोस्त' (Operation Dost) राबविण्यात आले आहे.

६ फेब्रुवारीला तुर्कीमध्ये तब्बल ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. यामध्ये तुर्कीसह सीरियातील शेकडो इमारती कोसळल्या. तसेच, अनेक रस्त्यांना तडे गेले असून काही वाहतुकीचे पूलही पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अद्यापही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु असून आत्तापर्यंत १६ हजारांहून अधिक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशामध्ये तुर्कीच्या मदतीसाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत. 'ऑपरेशन दोस्त' (Operation Dost) अंतर्गत भारताचे पथक तुर्कस्तान आणि सीरिया सरकार तसेच निवडक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत समन्वय साधून मदतकार्य करत आहे.

'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत १०१ जणांचे एनडीआरएफ पथक तुर्कीमध्ये दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत जखमी नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरु आहे. याचसोबत इतरही काही गरजेच्या वस्तू भारताने तुर्कीतील नागरिकांना पाठविल्या आहेत.

या ऑपरेशनदरम्यान एका टर्कीश महिलेने भारतीय सेनेच्या महिला जवानाचे आभार मानल्याचा एक भावनिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तुर्कीच्या नूरदागी भागामध्ये एनडीआरएफच्या पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्यातून एका ६ वर्षाच्या मुलीलासुरक्षित बाहेर काढले आहे. यामध्ये एनडीआरएफच्या डॉग स्क्वॉडने महत्वाची भूमिका बजावली आहे. एक पुरुष, एक महिला आणि एक वृद्ध महिलेच्या मृतदेहांमध्ये ही चिमुरडी सुरक्षित राहिली होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी या लहान मुलीला जिवंत बाहेर काढले. भारताची संपूर्ण एनडीआरएफची टीम दिवसरात्र एक करत या बचावकार्यात आपले योगदान देत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in