ड्रोन हल्ल्यामुळे खासदारांचे शिष्टमंडळ हवेतच अडकले

द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधीमंडळाचे विमान गुरुवारी मॉस्कोमध्ये उतरण्याच्या तयारीत असताना अचानक झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे विमानतळ बंद करण्यात आले. परिणामी, भारतीय खासदारांचे प्रतिनिधीमंडळ घेऊन जाणाऱ्या विमानाला हवेतच घिरट्या घालत राहावे लागले.
ड्रोन हल्ल्यामुळे खासदारांचे शिष्टमंडळ हवेतच अडकले
Published on

मॉस्को : द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधीमंडळाचे विमान गुरुवारी मॉस्कोमध्ये उतरण्याच्या तयारीत असताना अचानक झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे विमानतळ बंद करण्यात आले. परिणामी, भारतीय खासदारांचे प्रतिनिधीमंडळ घेऊन जाणाऱ्या विमानाला हवेतच घिरट्या घालत राहावे लागले. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे भारतीय खासदारांनी हवेतच अक्षरशः थरारक अनुभव घेतला.

युक्रेनकडून करण्यात आलेल्या या कथित ड्रोन हल्ल्यानंतर मॉस्कोतील डोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली. या घटनेमुळे कनिमोळींसह संपूर्ण प्रतिनिधीमंडळ असलेल्या विमानाला लँडिंगची परवानगी मिळाली नाही आणि विमान हवेतच थांबवावे लागले. काही तासांच्या विलंबानंतर विमान अखेर सुरक्षितपणे लँड झाले. रशियामधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधीमंडळाची विमानतळावर अगत्यपूर्वक भेट घेतली आणि त्यांना हॉटेलपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचवले. खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील हे प्रतिनिधीमंडळ रशिया, स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया आणि लाटविया या देशांचा दौरा करणार आहे.

या मोहिमेंतर्गत भारताची भूमिका मांडणे आणि पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. राजीव राय (समाजवादी पक्ष), मियाँ अल्ताफ अहमद (नॅशनल कॉन्फरन्स), बृजेश चौटा (भाजप), प्रेमचंद गुप्ता (आरजेडी), अशोक कुमार मित्तल (आप), माजी राजदूत मंजीव एस. पुरी, माजी राजदूत जावेद अश्रफ हे सर्व सदस्य या विमानात होते.

logo
marathi.freepressjournal.in