आज भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रम होत असून त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. त्यानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित आहेत. प्रत्येकवर्षी 4 डिसेंबर हा दिवस 'नौदल दिन' म्हणून साजरा केला जातो.
ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र या धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं आणि दर्यातील शत्रूंना धाकात ठेवलं. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये साजरा करण्यात येत आहे. कार्य्रक्रमाच्या या पार्शवभूमीवर सागरी सुरक्षा वाढवण्यात आली असून सागरी पोलीस समुद्रात बंदोबस्त करत आहेत.
भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कार्यक्रमात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला आहे. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधन केलं.
नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, समुद्री सामर्थ्य कोणत्याही देशासाठी किती महत्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तीशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. ते पुढे म्हणाले, भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. मागच्यावर्षी नौसेनेच्या ध्वजाला महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणेवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलातील महिलांच्या सहभागावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या महिला कमांडर ऑफिसरची नियुक्ती केली याबद्दल मी नौसेनेच अभिनंदन करतो, असं ते म्हणाले. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना बोट बनवण्याची कला पुन्हा विकसीत करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.