मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईत गणेशविसर्जनाची धामधूम सुरू असताना कफ परेड येथील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्रातून जवानाची इन्सास रायफल आणि ४० जिवंत काडतुसे चोरून पळालेल्या दोघा आरोपींना मुंबई पोलिसांनी तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातून अटक केली.
६ सप्टेंबर रोजी न्यू नेव्ही नगर येथील एपी टॉवर येथे एक जवान ड्युटी बजावत असताना एक अनोळखी व्यक्ती त्याच्याकडे गेला. त्याने आपण नौदलाच्या क्यूआरटी डिपार्टमेंट येथून आलो असल्याचे सांगितले. तुमच्या विश्रांतीची वेळ झाली असल्याने रायफल आणि काडतुसे आपल्याला देऊन हॉस्टेलवर जाण्यास सांगितले. त्यानुसार रायफल आणि काडतुसे त्याच्याकडे सोपवून हा जवान हॉस्टेलवर जात असताना आपण घड्याळ विसरल्याचे त्याच्या लक्षात आले. ते घेण्यासाठी तो परतला असता त्याला तो व्यक्ती कुठेच दिसला नाही. त्यामुळे आपल्याला फसवून रायफल चोरण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले.
या प्रकरणाबाबत कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असता गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने तांत्रिक तपासाच्या सहाय्याने दोघे आरोपी हे तेलंगणा येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर तातडीने आसिफाबाद पोलिसांच्या मदतीने राकेश डुब्बाला आणि उमेश डुब्बाला या दोघांना तेथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रायफल आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आले.