

नवी दिल्ली : रेल्वेने फुकटया व आधी वापरलेल्या तिकीटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठा झटका दिला आहे. विनातिकीट प्रवासाचा दंड रेल्वे २५० रुपयावरून ५०० रुपये, अवैध फेरीवाल्यांना २ हजार दंड, महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २५०० रुपये दंड आदी नियमांची अंमलबजावणी शनिवार, २० जूनपासून सुरू केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने १८ जूनला देशातील सर्व विभागांना पत्र लिहून या नियमांची माहिती दिली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व नियम १ जुलैपासून लागू केले जातील. पण, शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी करून हे नियम तात्काळ लागू केले.
रेल्वेने जाहीर केले की, जन विश्वास कायदा, २०२६ च्या तरतुदींनुसार, रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १३७ आणि १३८ अंतर्गत किमान दंडाची रक्कम २० जून २०२६ पासून वाढवून ५०० रुपये करण्यात आली आहे.
सुधारित नियमांनुसार, योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे, आधीच वापरलेले तिकीट पुन्हा वापरताना आढळलेल्या प्रवाशांना लागू असलेल्या भाड्यासोबत अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पावलामुळे विनातिकीट प्रवासाला आळा बसेल आणि रेल्वेच्या नियमांचे पालन सुधारण्यास मदत होईल.
दुसऱ्या तिकीटावर प्रवास केल्यास जप्तीची कारवाई
रेल्वेने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बुक केलेल्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीचे नियमही कडक केले आहेत. सुधारित तरतुदींनुसार, अशी तिकिटे जप्त केली जाऊ शकतात आणि प्रवाशाला लागू असलेले भाडे व अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ज्यात किमान दंड ५०० रुपये आहे. ही रक्कम न भरल्यास, पुढील कारवाईसाठी हे प्रकरण सक्षम न्यायालयाकडे पाठवले जाऊ शकते.
फेरीवाले आणि भीक मागणाऱ्यांवर अधिक दंड
नवीन नियमांमध्ये ट्रेन आणि रेल्वे परिसरात अनधिकृत फेरीवाले आणि भीक मागणाऱ्यांसाठी कडक दंडाची तरतूद आहे. परवानगीशिवाय वस्तू विकताना, फेरी मारताना किंवा ग्राहकांना आकर्षित करताना आढळणाऱ्या प्रवाशांना किंवा विक्रेत्यांना २ हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. पुन्हा तोच गुन्हा करणाऱ्यांना एक वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वे डबे आणि स्टेशन परिसरात भीक मागण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वेने कारवाई कडक केली आहे. शिवीगाळ किंवा अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या, रेल्वेच्या सुविधांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या किंवा सहप्रवाशांना त्रास देणाऱ्या प्रवाशांना सुधारित नियमांनुसार दंडाला सामोरे जावे लागू शकते. नशेत धुंद होऊन गोंधळ घालणाऱ्यांना ट्रेन आणि रेल्वे परिसरातून बाहेर काढले जाऊ शकते आणि त्यांच्यावर अतिरिक्त कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. महिलांसाठी राखीव असलेले डबे, जागा किंवा बर्थवर पुरुष बसलेले आढळल्यास त्यांना २,५०० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
रेल्वेचे नवीन नियम
विनातिकीट प्रवास ५०० रुपये दंड
महिलांच्या डब्यातून प्रवास - २५०० रुपये दड
धोकादायक वस्तू नेणे - १० हजार दंड
भीक मागणे, विनापरवाना फेरीवाले - २ हजार दंड
रेल्वेत शिव्या देणे १ हजार दंड