भारतीय रेल्वेने ऑगस्‍टमध्ये ११९ दशलक्ष टन केली मालवाहतूक

गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या १३१४ रेक्स होती म्हणजे यात ६८ टक्के वाढ झाली आहे
भारतीय रेल्वेने ऑगस्‍टमध्ये ११९ दशलक्ष टन केली मालवाहतूक

भारतीय रेल्वेने यंदा ऑगस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे ११९.३२ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे. ऑगस्टमध्ये ८.६९ दशलक्ष टन इतकी अधिक मालवाहतूक झाली आहे, म्हणजे ऑगस्ट २०२१मधील सर्वोत्तम आकडेवारीपेक्षा ७.८६ टक्के अधिक वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेने सलग २४ महिने सर्वोत्तम मासिक मालवाहतूक केली आहे.

रेल्वेने ९.२ दशलक्ष टन कोळसा, ०.७१ दशलक्ष टन खते, ०.६८ दशलक्ष टन उर्वरित इतर वस्तू आणि ०.६२ दशलक्ष टन कंटेनर इतकी अधिक मालवाहतूक केली आहे. वाहनांच्या वाहतुकीतील वाढ हे २०२२-२३ आर्थिक वर्षातील मालवाहतुकीचे आणखी एक वैशिष्ट्य असून या आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत २,२०६ वाघिणी (रेक्स)मधून वाहतूक करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या १३१४ रेक्स होती म्हणजे यात ६८ टक्के वाढ झाली आहे.

१ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत एकूण मालवाहतूक ६२०.८७ दशलक्ष टन झाली असून २०२१-२२ मधील ५६२.७५ दशलक्ष टनच्या तुलनेत ५८.११ दशलक्ष टन म्हणजे ही वाढ ०.३२ टक्का अधिक आहे. निव्वळ टन किलोमीटर (नेट टन किलोमीटर) मालवाहतूक ऑगस्ट २१मधील ६३ अब्ज वरून वाढून ऑगस्ट २२मध्ये ७३अब्जपर्यंत गेली आहे. ही वाढ १६ टक्के आहे. पहिल्या पाच महिन्यांत एकत्रित निव्वळ टन किलोमीटरमध्ये १८.२९ टक्के इतकी वाढ झाली आहे. ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयाच्या समन्वयाने वीज निर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेचे निरंतर प्रयत्न हे ऑगस्ट महिन्यातील मालवाहतुकीच्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा (देशांतर्गत आणि आयात दोन्ही) ऑगस्टमध्ये १०.४६ दशलक्ष टनने वाढला असून ४४.६४ दशलक्ष टन कोळसा वीज केंद्रांना पोहोचवण्यात आला, जो गेल्या वर्षी ३४.१८ दशलक्ष टन होता म्हणजे यात ३१ टक्के वाढ झाली आहे. याचाच अर्थ या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत, रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ५८.४१ दशलक्ष टनपेक्षा अधिक कोळसा वीज केंद्रांना पोहोचवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in