सर्वसामान्यांना झटका; रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ, २६ डिसेंबरपासून नवे दर लागू

भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भाडेवाढ जाहीर केली आहे. २६ डिसेंबरपासून हे नवीन दरभाडे लागू होतील. २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रत्येक किलोमीटरसाठी १ ते २ पैसे जादा मोजावे लागणार आहेत.
सर्वसामान्यांना झटका; रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ, २६ डिसेंबरपासून नवे दर लागू
सर्वसामान्यांना झटका; रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ, २६ डिसेंबरपासून नवे दर लागू
Published on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भाडेवाढ जाहीर केली आहे. २६ डिसेंबरपासून हे नवीन दरभाडे लागू होतील. २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रत्येक किलोमीटरसाठी १ ते २ पैसे जादा मोजावे लागणार आहेत. या निर्णयामुळे रेल्वेला सुमारे ६०० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. भारतीय रेल्वेने उपनगरी रेल्वेसेवा तसेच मासिक पासच्या दरांमध्येही कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि उपनगरी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी २१५ किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत.

नव्या भाडे रचनेनुसार, २१५ किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे. साध्या (ऑर्डिनरी) वर्गात २१५ किमीपुढील प्रत्येक किमीमागे १ पैसा अतिरिक्त आकारण्यात येणार आहे. तर मेल–एक्स्प्रेस नॉन-एसी आणि एसी वर्गात २१५ किमीपुढील प्रत्येक किमीमागे २ पैसे जादा मोजावे लागणार आहेत. ५०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १० रुपये अधिक द्यावे लागतील.

गेल्या १० वर्षात रेल्वेने नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्याने खर्च १ लाख १५ हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्चदेखील ६० हजार कोटींनी वाढला आहे. २०२४-२५ मधील रेल्वे चालवण्याचा खर्च २ लाख ६३ हजार कोटी रुपये झाला आहे. रेल्वेने वाढत्या मनुष्यबळाचा खर्च भागवण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे प्रवास भाडे कमी प्रमाणात वाढवण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या प्रयत्नांमुळे सुरक्षा वाढेल आणि रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढेल.

सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भाडेवाढ

भारतीय रेल्वेने या वर्षात दुसऱ्यांदा प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेने प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. १ जुलै २०२५ पासून रेल्वे प्रवासभाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेने प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in