रेल्वेची RAC सुविधा रद्द होणार? 'वंदे भारत स्लीपर'मध्ये शेअरिंग बर्थची व्यवस्था नाही

भारतीय रेल्वे दशकांपासून सुरू असलेली आपली 'रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन' (आरएसी) सुविधा रद्द करण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे. या सुविधेअंतर्गत दोन प्रवाशांना एकाच बर्थवर सामावून घेतले जाते, परंतु त्यांच्याकडून पूर्ण तिकीट दर आकारला जातो.
रेल्वेची RAC सुविधा रद्द होणार? 'वंदे भारत स्लीपर'मध्ये शेअरिंग बर्थची व्यवस्था नाही
रेल्वेची RAC सुविधा रद्द होणार? 'वंदे भारत स्लीपर'मध्ये शेअरिंग बर्थची व्यवस्था नाहीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

अभिषेक पाठक/मुंबई

भारतीय रेल्वे दशकांपासून सुरू असलेली आपली 'रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन' (आरएसी) सुविधा रद्द करण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे. या सुविधेअंतर्गत दोन प्रवाशांना एकाच बर्थवर सामावून घेतले जाते, परंतु त्यांच्याकडून पूर्ण तिकीट दर आकारला जातो. प्रवाशांची सोय आणि एका पूर्ण बर्थची सुविधा न देता संपूर्ण भाडे आकारण्याच्या औचित्यावरून निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर विचार केला जात आहे. विशेष म्हणजे, आगामी 'वंदे भारत स्लीपर' गाड्यांची रचना आरएसी सुविधेविना करण्यात आली असून प्रीमियम लांब पल्ल्याच्या सेवांमध्ये बर्थ वाटपाचा हा एक वेगळा दृष्टिकोन दर्शवतो.

प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विद्यमान व्यवस्थेचे परीक्षण केले जात असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. 'जेव्हा प्रवाशाला पूर्ण झोपण्यासाठी जागा मिळत नाही, तेव्हा त्यांच्याकडून पूर्ण भाडे आकारणे योग्य ठरणार नाही, असा एक मतप्रवाह आहे,' असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या मुद्द्याकडे एका संसदीय समितीचेही लक्ष वेधले गेले असून ज्या प्रवाशांना केवळ सामायिक (शेअर्ड) जागा मिळते त्यांच्याकडून पूर्ण भाडे आकारण्याच्या प्रथेचा फेरविचार करण्याची शिफारस समितीने रेल्वेला केली आहे.

सध्याची व्यवस्था अशी आहे

आरएसी व्यवस्थेत दोन प्रवाशांना एक 'साइड-लोअर बर्थ' दिला जातो. दिवसा त्यावर बसता येते; रात्री दोघांना तोच बर्थ सामायिक करावा लागतो. आरएसी प्रवाशांना राखीव डब्यात प्रवासाची परवानगी असते; वेटिंग लिस्ट प्रवाशांना ती नसते. कन्फर्म तिकीटधारकाने तिकीट रद्द केल्यास पूर्ण बर्थ मिळू शकतो. तोपर्यंत एकाच बर्थवर जुळवून घ्यावे लागते.

आरएसी कालबाह्य असल्याचा दावा

ही व्यवस्था अनेकदा गैरसोयीची ठरते, विशेषतः जेव्हा पुरुष आणि महिला प्रवाशांना एकच बर्थ दिला जातो. रिक्त बर्थ उपलब्ध नसताना पर्यायी व्यवस्था करण्यात तिकीट तपासनीसांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा रेल्वे आरक्षणे मोठ्या प्रमाणावर मानवी पद्धतीने (मॅन्युअली) हाताळली जात होती, तेव्हा ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. यामुळे अधिक प्रवाशांना सामावून घेणे आणि रद्द झालेल्या तिकिटांमुळे रिक्त झालेल्या बर्थचा वापर करणे शक्य झाले. मात्र, आता संगणकीकृत आरक्षण प्रणालीमुळे डायनॅमिक पद्धतीने बर्थचे वाटप करणे शक्य झाले असल्याने या सुविधेची खरोखरच आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वंदे भारत स्लीपरमध्ये अशी आहे रचना

'वंदे भारत स्लीपर' गाड्यांमध्ये आरएसीची कोणतीही तरतूद असणार नाही. या ट्रेनच्या आरक्षण नियमांनुसार, आगाऊ आरक्षण कालावधीच्या (एआरपी) सुरुवातीपासूनच सर्व उपलब्ध बर्थ बुकिंगसाठी खुले केले जातील. प्रवाशांना स्वतंत्र बर्थ दिले जातील आणि आरएसीअंतर्गत दोन प्रवाशांना एक बर्थ सामायिक करण्याची कोणतीही व्यवस्था यात नसेल. या ट्रेनमध्ये केवळ महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास या अस्तित्वात असलेल्या कोट्यांचाच समावेश असेल. इतर कोणताही आरक्षण कोटा लागू होणार नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)