

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता रेल्वे रुळांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवर होणारे मोठे अपघात आणि छोट्या-छोट्या त्रुटी वेळेतच शोधून काढता येऊ शकतात. प्रवाशांची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे वाढवणे, हाच या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
या तंत्रज्ञानात ‘मल्टी-सेंसर, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डिजिटल ट्विन आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सेंसरकडून मिळणाऱ्या डेटाचा वापर करून ही प्रणाली ट्रॅकची मजबुती आणि त्याच्या स्थितीची देखभाल करेल.
रेल्वेच्या माहितीनुसार, आयआयटी गुवाहाटी आणि आयआयटी भुवनेश्वर मिळून ‘ऑटोनॉमस युनिटरी सिस्टम फॉर इन्स्पेक्शन अँड मॉनिटरिंग ऑफ परमनंट वे’ नावाची हायटेक प्रणाली तयार करत आहेत.
रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे रोबोटिक मॉडेल सध्या पूर्णपणे तयार झालेले नाही; आयआयटी गुवाहाटी आणि आयआयटी भुवनेश्वर एकत्रितपणे यावर काम करत आहेत. हे मॉडेल तयार झाल्यानंतर त्याची पहिली चाचणी ईशान्य रेल्वेमध्ये घेतली जाईल आणि ती यशस्वी ठरल्यास देशभरात लागू केली जाईल.
अत्यंत फायदेशीर ठरेल हे तंत्रज्ञान
खरं तर, ईशान्य रेल्वेचे अनेक रेल्वे मार्ग डोंगराळ भाग, जंगले आणि अशा भागांतून जातात, जिथे मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन आदी समस्या उद्भवतात. अशा ठिकाणी रेल्वे रुळांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. विशेषतः आसाम आणि ईशान्येकडील अनेक भागांत पुराच्या वेळी बऱ्याचदा ट्रॅकखालील माती कमकुवत होते. अशा परिस्थितीत, ही एआय-आधारित प्रणाली ट्रॅकवर होणारे अगदी छोटे बदलही ओळखू शकेल आणि वेळेवर दुरुस्तीचे काम करता येईल.
काय आहे हे नवीन तंत्रज्ञान?
हे रेल्वे रुळांची सातत्याने देखरेख करेल.
सेंसरच्या मदतीने रुळांवर होणारे बारीक बदल आणि त्यातील त्रुटींची माहिती देईल.
एआय प्रणाली विश्लेषण करून रेल्वेला तत्काळ अलर्ट पाठवेल.
या तंत्रज्ञानात ‘डिजिटल ट्विन’चाही वापर केला जाईल, जेणेकरून रेल्वे ट्रॅकची एक डिजिटल कॉपी तयार करता येईल.
यामुळे रेल्वे रुळांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करणे आणि भविष्यात होणाऱ्या अपघातांचा अंदाज लावणे सोपे होईल.