नवी दिल्ली: स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा २०४७ साली देशातील रियल इस्टेट क्षेत्राचे मूल्यांकन ५.८ ट्रिलिअन डॉलरचा टप्पा ओलांडेल असा अंदाज नारडेको आणि नार्इट अॅंड फ्रॅंकच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काउंसिल आणि नार्इट अॅंड फ्रॅंक या दोन संस्थांनी संयुक्तरित्या भारतीय रियल इस्टेट उद्योगाचा आढावा घेउन भविष्यावर नजर टाकणारा ‘व्हिजन २०४७’ नावाचा अहवाल तयार केला आहे. नारडेकोचा २५ वा स्थापना दिन नुकताच हैदराबाद येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या रजत जयंती महोत्सवादरम्यान ‘व्हिजन २०४७’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. तेव्हा रियल इस्टेट क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती, धोरणकर्ते, मोठे उद्योजक तसेच रियल इस्टेट तज्ज्ञ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अहवालातील तपशीलानुसार रियल इस्टेट क्षेत्रात निवासी रियल इस्टेटचे योगदान ३.५ ट्रिलिअन डॉलर असेल तर ऑफिस रियल इस्टेटचे योगदान ०.४३ ट्रिलिअन डॉलर असेल. त्याचप्रमाणे खाजगी गुंतवणूकीचे प्रमाण ५४.३ अब्ज डॉलर असेल. या विकासामुळे रियल इस्टेट क्षेत्राचा देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेतील वाटा साल २०४७ पर्यंत ७.३ टक्क्यांवरुन १५.५ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २०४७ साली भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था ३३ ते ४० ट्रिलिअन डॉलरच्या घरात पोहोचेल असा अंदाज आहे. नारडेकोचे अध्यक्ष राजन बांदेलकर या प्रसंगी म्हणाले की ‘व्हिजन २०४७’ हे केवळ नारडेकोचे उद्दीष्ट नाही तर संपूर्ण भारतीय रियल इस्टेट क्षेत्राचे आहे. रियल इस्टेट क्षेत्र भारताच्या विकासाच्या इंजिनांपैकी एक असेल असेही बांदेलकर यांनी म्हटले आहे. पुढील काही वर्षांत भारताचा विकास बहुआयामी बहुक्षेत्रीय असेल. यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये मागणी वाढेल. निवासी, व्यापारी, वखारी, औद्योगिक बांधकाम अशा सर्व क्षेत्राकडून मागणी वाढेल. यामुळे देशाचा विकास देखील चहूबाजुंनी होर्इल अशी आशा देखील बांदेलकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली.