
जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आणि विदेशी गुंतवणूक संस्थांनी खरेदी केल्यामुळे प्रारंभीच्या घसरणीनंतरही भारतीय शेअर बाजार सावरला गेला. मंगळवारी दिवसअखेरीस सेन्सेक्स २४६ अंकांनी वधारला.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २४६.४७ अंक किंवा ०.४५ टक्का वाढून ५४,७६७.६२ वर बंद झाला. सकाळी व्यवहार सुरु झाला तो घसरणीने. दोलायमान स्थितीत सेन्सेक्स ५४,८१७.५२ ही कमाल तर ५४,२३२.८२ ही किमान पातळी गाठली. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ६२.०५ अंक किंवा ०.३८ टक्का वधारुन १६,३४०.५५ वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत ॲक्सीस बँक, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व, इंडस्इंड बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या समभागात वाढ झाली. तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज आणि एशियन पेंटस् यांच्या समभागात घसरण झाली.
आशियाई बाजारात सेऊलमध्ये घसरण तर टोकियो, शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत संमिश्र वातावरण होते तर अमेरिकेमध्ये सोमवारी घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.५७ टक्का घसरुन १०५.७ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाला आहे. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी १५६.०८ कोटींच्या समभागांची खरेदी केली, अशी प्राथमिक माहिती शेअर बाजाराने दिली.