

जयपूर : जयपूरमध्ये गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या महिलेने नेपाळमार्गे पाकिस्तानात जाऊन एका संशयित दहशतवादी कमांडरशी लग्न करण्याची तयारी केली होती. हा कमांडर प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझर याचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
या महिलेचे भावनिक शोषण करण्यात आले असून, एका ऑनलाइन मुस्लिम धर्मप्रसारकाने तिचे धर्मांतर केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
बबिता धाकड उर्फ खादिजा असे या महिलेचे नाव असून, ती अनेक आठवड्यांपासून लष्करी गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होती. राजस्थान पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तिला रविवारी अटक केली असून, तिच्यावर ‘बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्या’च्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीत अनेक पाकिस्तानी क्रमांक सापडले आहेत. यात ‘जैश’चा जवळचा नातेवाईक युसूफ अझर आणि भारतात अनेक गुन्ह्यांसाठी हवा असलेला कारी जरार यांच्या क्रमांकांचा समावेश असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हल्ल्यानंतर दहशतवाद्यांशी संबंध वाढले
बबिताने सांगितले की, २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर तिने सोशल मीडियावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू अतिरेकी विचारसरणीच्या लोकांशी तिचे संपर्क वाढले. त्यानंतर ती पाकिस्तान संबंधित फेसबुक पेजेस पाहत होती.