
नवी दिल्ली : नेपाळच्या काठमांडू येथे सुरू असलेल्या हिंसक सरकारविरोधी आंदोलनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील वाहतूक व्यावसायिक रामवीर सिंग गोला (५८) आणि त्यांची पत्नी राजेश देवी (५७) हे ७ सप्टेंबर रोजी पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी काठमांडूला गेले होते. ते पंचतारांकीत 'हयात रीजेन्सी' हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर थांबले होते.
पण, ९ सप्टेंबर रोजी “Gen Z” आंदोलन हिंसक होत गेले आणि रात्री आंदोलकांनी 'हयात रीजेन्सी' हॉटेलला आग लावली. काही वेळातच धुराने व ज्वाळांनी मार्ग बंद झाल्याने पर्याय नसल्याने बचाव पथकांनी जमिनीवर गाद्या ठेवून उडी मारण्याचा सल्ला दिला. महिलेच्या पतीने हाती लागेल त्याच्या सहाय्याने रस्सी बनवण्याचा प्रयत्न केला. चौथ्या मजल्यावरून खाली घसरून उडी मारल्यावर पतीला किरकोळ दुखापत झाली होती. पण, राजेश देवी गंभीर जखमी झाल्या आणि उपचार सुरू असताना १० सप्टेंबर रोजी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
...तर माझी आई जिवंत असती
गुरुवारी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली सीमेवरून राजेश देवी यांचे पार्थिव गाझियाबादला आणण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. "माझी आई खाली उतरताना घसरली आणि जोरात पडली. बचावकार्यानंतर माझ्या आईला वडिलांपासून वेगळं केलं गेलं. दोन दिवस आम्हाला त्यांचा ठावठिकाणा माहित नव्हता. शेवटी, माझे वडील एका मदत छावणीत असल्याचं समजलं. पण, माझ्या आईचा रुग्णालयात मृत्यू झाला. आई माझ्या वडिलांसोबतच असती तर जिवंत राहिली असती", असे त्यांचा मुलगा विशाल गोला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधी आणि भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनामुळे किमान ५१ जण ठार झाले असून १,३०० हून अधिक जखमी झाले आहेत. सोमवारी या आंदोलनात सर्वाधिक मृत्यू झाले, त्यानंतर मंगळवारी आंदोलकांनी संसद भवन आणि काही मंत्र्यांची घरे जाळून टाकली. या आंदोलनामुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिला. दरम्यान, नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.