Video : "माननीय REEL मंत्री जी, हे कवच कुठं आहे?" कंचनजंगा एक्सप्रेसच्या अपघातानंतर युवक काँग्रेसनं शेअर केला 'तो' व्हिडिओ

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून कवच सिस्टीम कार्यान्वित करणार असल्याचं सांगितलं होते.
Video : "माननीय REEL मंत्री जी, हे कवच कुठं आहे?" कंचनजंगा एक्सप्रेसच्या अपघातानंतर युवक काँग्रेसनं शेअर केला 'तो' व्हिडिओ

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात एक मालगाडी आणि कंचनजंगा एक्सप्रेस यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सुमारे ९ लोकांचा मृत्यू झाला असून २५-३० लोक जखमी झाले आहेत. हा भारतातील यंदाचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. कंचनजंगा एक्सप्रेस अगरतळाहून पश्चिम बंगालच्या सियालदह जात होती. या दरम्यान न्यू जलपाईगुडीमध्ये हा रेल्वे अपघात घडला. दरम्यान या अपघातानंतर युवक काँग्रेसनं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते कवच सिस्टीमबद्दल माहिती सांगतांना दिसत आहे.

वर्षभरापूर्वी ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून कवच सिस्टीम कार्यान्वित करणार असल्याचं सांगितलं होते. कवच सिस्टीम कशा पद्धतीनं काम करेल, हेही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान आज पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कंचनजंगा एक्सप्रेसच्या अपघातानंतर युवक काँग्रेसनं अश्विनी वैष्णव यांचा व्हिडिओ शेअर करत कवच सिस्टीम कुठं आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नेमकी काय आहे हे 'कवच' प्रणाली?

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वेकडून कवच प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन आल्यास स्वत:हून थांबतील. भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन अॅन्ड स्टँडर्ड ऑर्गनायजेशन अंतर्गत ही प्रणाली विकसित केली आहे. रेल्वेने २०१२ पासून ही प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली होती. २०१६ मध्ये प्रणालीची पहिली चाचणी घेण्यात आली होती. तर २०२२ मध्ये या प्रणालीचा लाइव्ह चाचणी घेण्यात आली. रेल्वेकडून कवच प्रणाली काही ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. परंतु ही प्रणाली अजून सर्व रेल्वे मार्गांवर लावण्यात आलेली नाही. टप्प्याटप्प्यानं ही प्रणाली रेल्वेकडून वेगवेगळ्या मार्गांवर लावण्यात येत आहे.

कवच प्रणाली कसं काम करते?

कवच प्रणालीमध्ये अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे नियंत्रण ठेवण्यात येते. जेव्हा एखादा लोको पायलट सिग्नल तोडतो, तेव्हा ही कवच प्रणाली सुरु होते. त्यानंतर ही प्रणाली लोको पायलटला सतर्क करते आणि ट्रेनच्या ब्रेक्सवर नियंत्रण मिळवते. जसं या प्रणालीला कळतं, एकाच ट्रॅकवर दुसरी रेल्वे येत आहे, तेव्हा ती आधीच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवते. या प्रणालीमुळे एकाच ट्रॅकवर असणाऱ्या दोन रेल्वेवर नियंत्रण मिळवण्यास शक्य होते. तसेच ठराविक अंतरावर दोन्ही रेल्वे या प्रणालीमुळे थांबतात आणि अपघात टाळता येतात.

लोको पायलट द्वारे सिग्नल ओव्हरशूटमुळं अपघात?

रिपोर्टनुसार, कंजनजंगा एक्सप्रेस ट्रेन ज्या ट्रॅकवर होती, त्याच ट्रॅकवर मालगाडी आली आणि तिनं पाठीमागील बाजूने कंजनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे शेवटचे दोन डबे पटरीवरून उतरले. त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत सुमारे ९ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. लोको पायलट आणि एका गार्डचा मृत्यू झाल्याचं समजतंय. लोको पायलट द्वारे सिग्नल ओव्हरशूटमुळं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जर कवच प्रणाली असती तर हा अपघात कदाचित टळला असता.

logo
marathi.freepressjournal.in