
भारतीय माणूस हा पापभिरू आहे. देव, धर्म यासाठी तो तत्काळ आपल्या खिशात हात घालतो. २०२१-२२ या वर्षभरात भारतीयांनी धार्मिक संस्थांना २३ हजार कोटी रुपयांची देणगी दिल्याचे अशोका विद्यापीठाच्या अभ्यासात उघड झाले आहे.
‘२०२०-२१मध्ये भारतीयांचे दान’ यावरील अहवाल अशोका विद्यापीठाने तयार केला. विशेष म्हणजे, बहुतांशी देणगी ही रोख स्वरूपात देण्यात आली. १८ राज्यांतील ८१ हजार घरांचा सर्व्हे करण्यात आला. १६.६ हजार कोटी इतकी प्रचंड रक्कम धार्मिक संस्थांना रोख स्वरूपात देण्यात आली. तर भिकाऱ्यांना २.९ हजार कोटी रुपये, कुटुंब व मित्रांना दोन हजार कोटी, अधार्मिक संस्थांना १.१ हजार कोटी रुपये, घरातील कर्मचाऱ्यांना एक हजार कोटी रुपये दान देण्यात आले.
जास्त रकमेची देणगी ही कुटुंब व कुटुंबाशी संबंधित मित्रांना देण्यात आली. ही रक्कम पाच ते १० हजार रुपयांच्या दरम्यान होती. तर बहुतांशी १०० रुपयांची देणगी ही भिकाऱ्यांना देण्यात आली. तर १०१ ते ५०० रुपयांपर्यंतच्या देणग्या या धार्मिक व अधार्मिक संस्थांना देण्यात आल्या, असे अभ्यासात म्हटले. अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणे भारतीयांना मिळवलेली धार्मिक शिकवण आहे. प. भारतापेक्षा दाक्षिणात्य लोक जास्त रकमेची देणगी देतात.