भारतातील शंभर श्रीमंतांची एकूण संपत्ती ८०० अब्ज डॉलर्सहून अधिक; अदानी अव्वल

यंदा देशातील शंभर श्रीमंतांच्या यादीत नऊ नवे चेहरे आहेत. यापैकी तीन नावे आयपीओमुळे यादीत समाविष्ट झाली आहेत
भारतातील शंभर श्रीमंतांची एकूण संपत्ती ८०० अब्ज डॉलर्सहून अधिक; अदानी अव्वल

कोरोना महामारीनंतर देशातील मागणी वाढल्याने भारताने ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. या कालावधीत देशांतर्गत शेअर बाजारात मागील वर्षाच्या तुलनेत थोडीशी घसरण झाली. या काळात रुपयात सर्वाधिक कमजोरी दिसून आली. हे सर्व असूनही, २०२२च्या फोर्ब्सच्या यादीनुसार, भारतातील शंभर श्रीमंत लोकांच्या संपत्तीत २५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि त्यांची एकूण संपत्ती ८०० अब्ज डॉलर्सहून अधिक झाली आहे.

देशातील १०० श्रीमंतांच्या यादीत नऊ नव्या चेहऱ्यांचा समावेश

यंदा देशातील शंभर श्रीमंतांच्या यादीत नऊ नवे चेहरे आहेत. यापैकी तीन नावे आयपीओमुळे यादीत समाविष्ट झाली आहेत. पहिले नाव म्हणजे फाल्गुनी नायर. स्टॉक एक्स्चेंजवर सौंदर्य आणि फॅशन रिटेल ब्रँड नायका सूचीबद्ध झाल्यानंतर माजी बँकर नायर ह्या देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. पारंपारिक कपडे निर्माता रवी मोदी (मान्यवर) आणि फुटवेअर कंपनी मेट्रो ब्रँड्सचे संस्थापक रफिक मलिक हे देखील स्टॉक एक्स्चेंजवर त्यांच्या कंपन्या सूचीबद्ध झाल्यानंतर या यादीत सामील झाले आहेत.

२०२२मध्ये देशातील शंभर श्रीमंतांपैकी चार जणांचा मृत्यू

भारतातील १०० श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या चार जणांचे या वर्षी निधन झाले. यामध्ये बजाज समूहाचे प्रमुख राहुल बजाज, राकेश झुनझुनवाला, भारताचे वॉरन बफेट मानले जाणारे अनुभवी गुंतवणूकदार आणि बांधकाम क्षेत्रातील दिग्गज पालोनजी मिस्त्री यांचा समावेश आहे. पालोनजी मिस्त्री यांचा ५४ वर्षीय मुलगा सायरस मिस्त्री यांचाही वडिलांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी सप्टेंबरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. आता त्यांचा १४.२ अब्ज डॉलरचा कौटुंबिक व्यवसाय पालोनजी मिस्त्री यांचा मोठा मुलगा शापूरजी मिस्त्री सांभाळत आहेत.

४०उद्योगपतींची संपत्ती वाढली, ६० जणांच्या संपत्तीत घट

या यादीत यंदा चार उद्योगपतींनी पुन्हा स्थान मिळवले आहे. त्यापैकी महिंद्र अँड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा हे प्रमुख नाव आहे. यादीत ४० जणांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, तर ६० व्यावसायिकांच्या संपत्तीत घट झाली आहे. या यादीतून बाहेर पडलेल्यांमध्ये पेटीएम (वन९७ कम्युनिकेशन्स)चे विजय शेखर शर्मा यांचा समावेश आहे.

अदानींची संपत्ती दुप्पट, निव्वळ संपत्ती १५० अब्ज डॉलर्स

भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत ही वाढ प्रामुख्याने पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे झाली. २००८ नंतर प्रथमच १०० सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीतील आघाडीच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. २०२१ मध्ये अदानी यांच्या संपत्तीत तिपटीने वाढ झाली होती. या वर्षी त्यांची संपत्ती दुप्पट होऊन १५० अब्ज डॉलर्स झाली आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. डॉलर आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीत त्यांची संपत्ती यावर्षी सर्वाधिक वाढली आहे. अदानी यांनी जाहीर केले आहे की ते पुढील दशकात १०० अब्ज डॉलर्स गुंतवतील, त्यातील ७० टक्के गुंतवणूक हरित ऊर्जा क्षेत्रात असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in