‘नवी दिल्ली’ जगातील सर्वात ‘प्रदूषित राजधानी’, खराब हवेबाबतचा नकोसा मान बांगलादेशला

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगात दरवर्षी ७० लाख लोक प्रदूषित हवेमुळे बळी पडतात. मरणाऱ्या प्रत्येक ९ व्यक्तींपैकी एक जण खराब हवेमुळे मृत्यू पावत आहे.
‘नवी दिल्ली’ जगातील सर्वात ‘प्रदूषित राजधानी’, खराब हवेबाबतचा नकोसा मान बांगलादेशला

नवी दिल्ली : बिहारमधील ‘बेगुसराय’ हे शहर जगातील महानगर क्षेत्रातील सर्वाधिक प्रदूषण असलेले महानगर ठरले असून, भारताची राजधानी ‘नवी दिल्ली’ ही जगातील सर्वात जास्त ‘प्रदूषित राजधानी’ ठरली आहे. तर खराब हवेबाबतचा नकोसा मान बांगलादेशला मिळाला आहे.

स्वीस संस्थेच्या ‘आयक्यू एअर’ने जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ जाहीर केला आहे. यात १३४ देशांचा अभ्यास करून ही यादी बनवली आहे. या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची माहिती देण्यात आली आहे. त्यात बांगलादेश हा जगातील सर्वात खराब हवा असलेला देश असून दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा समावेश आहे.

या अहवालानुसार, नवी दिल्ली जगातील सर्वात खराब हवा असलेली राजधानी, बिहारचे ‘बेगुसराय’ हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर आहे. २०२२ मध्ये प्रदूषित हवा असलेल्या देशांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. या अहवालात ‘पीएम-२.५’ कणांच्या आधारे देश, राजधानी आणि शहरांची क्रमवारी लावली आहे. ‘पीएम-२.५’ हा अशा प्रकारचा कण आहे. ज्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. गेल्या वर्षी भारतात पीएम २.५ ची सरासरी पातळी १ घनमीटरमध्ये ५४.४ मायक्रोग्रॅम होती. हे प्रमाण डब्ल्यूएचओ प्रमाणापेक्षा १० पट अधिक आहे.

गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत पीएम २.५ ची पातळी १ घनमीटरमध्ये ९२.७ मायक्रोग्रॅम होती. तर बेगुसरायमध्ये ते ११८.९ मायक्रोग्रॅम होते. २०१८ पासून सलग चार वेळा दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. भारतातील १३३ कोटी लोक अशा हवेत श्वास घेतात, त्याची पीएम २.५ पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक मानकापेक्षा ७ पट अधिक आहे. देशातील ६६ टक्के शहरांमध्ये वार्षिक पीएम २.५ पातळी ३५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक होती.

वायू प्रदूषणामुळे ७० लाख जणांचा बळी

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगात दरवर्षी ७० लाख लोक प्रदूषित हवेमुळे बळी पडतात. मरणाऱ्या प्रत्येक ९ व्यक्तींपैकी एक जण खराब हवेमुळे मृत्यू पावत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in