भारताची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताने गेल्या एका दशकात प्रत्येक आघाडीवर झपाट्याने प्रगती केली आहे
भारताची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही

डेहराडून : भारताची अर्थव्यवस्था सन २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या समारोप सत्राला संबोधित करताना शहा यांनी हे वक्तव्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताने गेल्या एका दशकात प्रत्येक आघाडीवर झपाट्याने प्रगती केली आहे. जग आज भारताकडे आशेने पाहत आहे. २०१४ ते २०२३ दरम्यान भारत जगातील ११ व्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये देशाने एवढी मोठी झेप घेतली नव्हती. मोदी हवामान बदलाच्या चळवळीचे नेतृत्व करत आहेत आणि ते मेक इन इंडिया कार्यक्रमाद्वारे जगाच्या मंदावलेल्या जीडीपीला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच दहशतवादमुक्त जगाच्या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत, असे शहा म्हणाले. मॉर्गन स्टॅन्ले या अर्थविषयक संस्थेने म्हटले आहे की, २०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीच्या पुढे जाऊन भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. ही चांगली चिन्हे आहेत. पुढील काळ भारताचा आहे, असेही शहा यांनी सांगितले.

उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटबद्दल ते म्हणाले की, जेव्हा मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी त्यांना सांगितले की त्यांनी शिखर परिषदेसाठी २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तेव्हा त्यांना वाटले की ते अशक्य आहे. परंतु मी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. दोन दिवसीय शिखर परिषदेने उत्तराखंडसाठी अनेक नवीन गोष्टींची सुरुवात केली आहे, असे शहा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in