

नवी दिल्ली : भारताची लढाई दहशतवादाविरोधात आहे. पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही. पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांना मदत केली तेव्हा आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले, असे स्पष्टीकरण भारतीय हवाई दलाने सोमवारी दिले.
‘ऑपरेशन सिंदूर’वर भारतीय सैन्य दलाने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. लष्कराकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, नौदलाकडून व्हाईस ॲॅडमिरल ए.एन. प्रमोद आणि हवाई दलाकडून एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी माहिती दिली.
एअर मार्शल भारती म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याच्या नुकसानीला ते स्वत: जबाबदार आहेत. कारण दहशतवाद्यांच्या विरोधातील भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याने मध्ये हस्तक्षेप केला. त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले. पाकने चिनी बनावटीचे क्षेपणास्त्रे डागली. त्यात दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे होती. कॉप्टर्स व ड्रोन होते. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते पाडले. आम्ही नागरी वस्त्या व लष्करी आस्थापनांची कमीत कमी हानी होईल हे पाहिले. मात्र, पाकिस्तानी लष्कर सातत्याने भारताच्या सर्वच जागांवर हल्ले करत होते. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेत विविध प्रणाली आहेत. यात कमी उंचीवरील गोळीबार, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, दीर्घ व लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे व मानवरहित यंत्र आदींने आम्ही हल्ला केला.
सर्व यंत्रणा एकत्रित कार्यान्वित
पाकिस्तानी हल्ल्याच्यावेळी सर्व यंत्रणा एकाचवेळी कार्यान्वित झाल्या होत्या. ही बाब आधुनिक युद्धाच्या काळाशी सुसंगत होती. जुन्या काळातील हवाई संरक्षण यंत्रणेनेही योग्य पद्धतीने काम केले. शत्रूचे ड्रोन, लढाऊ विमान व क्षेपणास्त्र पडली. भारताच्या बाजूचे कमी नुकसान झाले, असे ते म्हणाले. भारतातील हवाई संरक्षण यंत्रणेत घुसताना कोणती न कोणती यंत्रणा शत्रूचे विमान, क्षेपणास्त्र पाडेल. कारण भारताची हवाई संरक्षण यंत्रणा प्रत्येक क्षणी कार्यान्वित आहे.
‘बीएसएफ’चे कौतुक
‘बीएसएफ’च्या महासंचालकांबरोबरच तळावर पहारा देणाऱ्या जवानांनी आम्हाला मदत केली. आमच्या बहुउद्देशीय गटात ते सहभागी होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तिन्ही सैन्य दलांनी एकत्रित काम केले. १४० कोटी भारतीय आमच्या पाठिशी उभे होते.
पाक अण्वस्त्रे असलेल्या किराना हिल्सवर हवाई हल्ला केला का? या प्रश्नावर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, किराना हिल्समध्ये अण्वस्त्र साठे आहेत हे आम्हाला सांगण्यासाठी आभार. आम्हाला याबद्दल माहिती नव्हते. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. मग तिथे काहीही असो अथवा नसो. कालच्या पत्रकार परिषदेत आमच्याकडून सगळी माहिती दिली गेली आहे.
‘किराना हिल्स’ संवेदनशील का आहे?
सरगोधा हवाई तळापासून किराना हिल्स ८ किमी अंतरावर आहे. ७० चौरस किमी क्षेत्रावर जमिनीखाली अण्वस्त्र फॅसिलिटी केंद्र आहे. या संपूर्ण परिसरावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण आहे. १९९० मध्ये जगाला याबाबत पहिल्यांदा माहिती मिळाली. अमेरिकेच्या उपग्रहांनी पाकिस्तान सरकारकडून केलेल्या अण्वस्त्र चाचण्या पकडल्या. अमेरिकेने यावर आक्षेप घेतल्यानंतर त्या चाचण्या रद्द केल्या. पाकिस्तानने या ठिकाणी अण्वस्त्र लपवून ठेवलेली आहेत, असे बोलले जाते.
भारत-पाकिस्तान ‘डीजीएमओ’मध्ये चर्चा
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये सोमवारी सायंकाळी चर्चेची पहिली फेरी पार पडली. संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले की, भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई व पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशीद अब्दुल्लाह यांच्यात हॉटलाईनवरून चर्चा झाली. मात्र, या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही.