भारतातील ट्रान्स मॅनची पहिली गर्भधारणा ; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला बुधवारी सरकारी रुग्णालयात झाले बाळ

बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम दरम्यान, नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार
भारतातील ट्रान्स मॅनची पहिली गर्भधारणा ; केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला बुधवारी सरकारी रुग्णालयात झाले बाळ
Published on

नुकतीच गर्भधारणेची घोषणा करणाऱ्या केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला बुधवारी कोझिकोडे येथील सरकारी रुग्णालयात बाळ झाले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना आहे. ‘सकाळी ९.३० च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला,’ असे ट्रान्स जोडप्यापैकी एक झिया पावलने सांगितले. बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे झियाने सांगितले. दरम्यान, त्यांनी नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला आहे.

याबाबत त्यांनी सांगितले की, ते आत्ताच ही बाब सार्वजनिक करू इच्छित नाहीत. झिया पावलने अलीकडेच इंस्टाग्रामवर जहाद आठ महिन्यांची गरोदर असल्याचे जाहीर केले होते. पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘आम्ही माझे आई होण्याचे आणि त्याचे वडील बनण्याचे स्वप्न साकार करणार आहोत. आठ महिन्यांचा गर्भ आता (जहादच्या) पोटात आहे. आम्हाला जे कळले त्यावरून भारतातील ट्रान्स मॅनची ही पहिलीच गर्भधारणा आहे.’

झिया पावल आणि जहाद हे जोडपे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत. इंटरनेट युजर्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. युजर्सनी हार्ट इमोजींनी कॉमेंट सेक्शनही भरून काढले आहे.

तीन वर्षांपूर्वी केरळच्या कोझिकोडे शहरात झिया पावल जहादला भेटली होती. हे दोघेही ट्रान्सजेंडर होते. पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांच्यात जवळीक वाढू लागली. लवकरच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. झिया सुरुवातीला एक मुलगा होता. जहादला भेटल्यानंतर वर्षभरानंतर त्याने आपले लिंग बदलून मुलगी झाली. त्याच वेळी जहादने मुलीतून मुलगा होण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यानच्या काळात जहाद गरोदर राहिला. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, जेव्हा पुरुष ट्रान्सजेंडरने एका बाळाला जन्म दिला.

logo
marathi.freepressjournal.in