
भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘एलएसडी’ हा सर्वात उच्चप्रतीचा अमली पदार्थाचा साठा अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) पकडला आहे. देशातून १५ हजार एलएसडीच्या ब्लॉट्स पकडल्या आहेत. हे आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. क्रिप्टोकरन्सी व डार्कनेटच्या सहाय्याने या तस्करीच्या पैशाचे हस्तांतरण केले जात होते हे उघड झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात एका एलएसडी ब्लॉकचा दर ५ ते ७ हजार रुपये आहे. यातून हे अमली पदार्थ शेकडो कोटी रुपयांचे असावेत. यात विद्यार्थ्यांसह तरुणांचा समावेश आहे.
झटपट पैसे मिळवण्याच्या नादात हे तरुण या तस्करीत आढळले. यासाठी इंटरनेटवरील गुप्त ॲॅपचा वापर केला जात होता. तसेच मेसेंजर सेवा ‘विक्र’ यांचा वापर होत होता. ही कारवाई केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अमली पदार्थविरोधी विभागाचे अभिनंदन केले आहे. सायबर दक्षता व मानवी गुप्तचरांच्या समन्वयाचे हे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
एलएसडी हे (लिसर्जिक ॲॅसिड डायथायमाईड) हे कृत्रिम रसायनाने बनवलेला अमली पदार्थ आहे. स्टॅम्प पेपरच्या आकाराच्या अर्ध्या साइझच्या ब्लॉटद्वारे याची तस्करी होत होती. कागद चाटणे किंवा गिळणे आदीद्वारे त्याचे सेवन केले जाते.
एका मोहिमेत मोठ्या प्रमाणावर एलएसडी सापडणे ही भारतातील पहिलीच घटना आहे. आतापर्यंत ६ तरुणांना अटक झाली आहे. या आरोपींचे वय २५ ते २८ वयोगटातील आहे. या टोळीचा शोध घेतला जात आहे, असे एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर विभाग) ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले. गेले दोन आठवडे ही मोहीम सुरू होती. यातून १४९६१ ब्लॉट्स जप्त केले. गॅमागोब्लीन व असुरा अशी त्यांना ब्रँडची नावे दिली होती. एलएसडीचे ५ हजार ब्लॉट्स हे कर्नाटकात २०२१ मध्ये पोलिसांनी पकडले होते. कोलकात्यात २०२२ मध्येही ५ हजार एलएसडीचे ब्लॉट्स पकडले होते. तरुणांमध्ये एलएसडीचे सेवन करण्याचे मोठे व्यसन लागले आहे. त्यामुळे शरीरावर मोठे घातक परिणाम होतात, असे सिंग म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एलएसडीला बेकायदेशीर औषधांच्या भाषेत 'अॅसिड' म्हणून ओळखले जाते. ते गंधहीन, रंगहीन आणि चवहीन असते. या पदार्थाचे सेवन केल्यास जागा, अंतर आणि वेळ यांचे भान गमावले जाते. त्याच्या निर्णयावर आणि वागणुकीवर गंभीर परिणाम होतो. ०.१ ग्रॅम एलएसडी मिळाल्यास त्याच्या अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. या कायद्यात जामिनाची तरतूद नाही. तसेच त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
हे एलएसडी पोलंड व नेदरलँडहून आले होते. ही टोळी देशभरात पसरली असून, ते क्रिप्टोकरन्सी व यूपीआयद्वारे पैसे घेतात. कुरियर व पोस्टाद्वारे या पदार्थांची तस्करी चालते, असे सिंग म्हणाले. एलएलडीबरोबरच २.३२ किलो गांजा, ४.६५ लाख रुपये रोख रक्कम पकडली असून, २० लाख रुपयांच्या बँकेच्या मुदत ठेवी गोठवल्या आहेत, असे सिंग यांनी सांगितले.