
नवी दिल्ली : भारत २०३५ पर्यंत आपले स्वत:चे अंतराळ स्थानक अवकाशात स्थापन करेल. त्याचे नाव ‘भारत अंतराळ स्थानक’ असे असेल. तसेच २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयाला पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी केली.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सिंह यांनी सांगितले की, २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला ‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहे. तसेच, भारत आपल्या खोल समुद्र मोहिमेअंतर्गत ६,००० मीटर खोलीवर मानव पाठवण्याची योजना आखत आहे.
अंतराळ क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकार नवीन कायद्यावर काम करत आहे. गेल्या चार वर्षांत या क्षेत्रातील उपग्रहांच्या निर्मिती आणि प्रक्षेपणात खासगी कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे या क्षेत्रात बरीच सुधारणा झाली आहे.
२०१४ मध्ये ‘स्पेस स्टार्ट-अप’ची संख्या फक्त एक होती, ती आता २६६ झाली आहे. भारताने आतापर्यंत श्रीहरिकोटा प्रक्षेपण स्थळावरून ४३२ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यापैकी ३९७ गेल्या १० वर्षांत प्रक्षेपित करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारने अंतराळ विभागाच्या अंतर्गत ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर’सारख्या सरकारी एजन्सी तयार केल्या आहेत, ज्या खाजगी संस्थांना अवकाश क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन, नियमन आणि परवानगी देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे ते म्हणाले. इस्रोने ५ डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘प्रोबा-३’ मोहीम प्रक्षेपित केली. युरोपियन स्पेस एजन्सीच्या या मोहिमेचा उद्देश ‘कोरोनाग्राफ’ आणि ‘ऑकल्टर’ या दोन उपग्रहांद्वारे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे आहे, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
‘गगनयान’ मोहिमेद्वारे ४ अंतराळवीर अवकाशात जाणार
गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे. ज्याअंतर्गत चार अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत. हे ३ दिवसांचे मिशन असून, अंतराळवीरांची एक टीम पृथ्वीच्या ४०० किमीवरच्या कक्षेत पाठवली जाईल. त्यानंतर क्रू मॉड्यूलला समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर भारत आपल्या मिशनमध्ये यशस्वी झाला तर असे करणारा तो चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने ही कामगिरी केली आहे.
२०४७ पर्यंत अनेक मोठ्या योजना राबवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ स्थानकाचा पहिला टप्पा उभारण्यासाठी ‘गगनयान’ मोहीम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय चांद्रयान-४ द्वारे चंद्र खडकांचे नमुने परत आणणे, शुक्र ग्रहाचा अभ्यास करणे आणि पुढील पिढीतील प्रक्षेपण वाहने तयार करणे यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. २०४७ पर्यंत विज्ञान आणि अवकाशात जागतिक स्तरावर आघाडी घेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.