अंतराळ, सौरऊर्जा क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवकांकडून देशाला मिळालेली ही विशेष दिवाळी भेट आहे
अंतराळ, सौरऊर्जा क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारताने सौरऊर्जा क्षेत्राबरोबरच अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे संपूर्ण जग भारताची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झाले आहे, अशा शब्दात ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच भारताने एकाचवेळी ३६ उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण केले. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवकांकडून देशाला मिळालेली ही विशेष दिवाळी भेट आहे. या प्रक्षेपणामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा संपूर्ण देशभरात डिजिटल संपर्क व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. याच्या मदतीने दुर्गम आणि दूरवरचे भागही देशाच्या उर्वरित भागांशी सुलभतेने जोडले जातील. देश जेव्हा आत्मनिर्भर होतो तेव्हा तो यशाच्या नव्या उंचीवर कसा पोहोचतो याचे एक उदाहरण आहे. फार पूर्वी भारताला क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान द्यायला नकार देण्यात आला होता. पण, भारतातील वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे पण त्याच बरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीने आज भारत एकाच वेळी अनेक डझन उपग्रह अंतराळात पाठवत आहे. उपग्रहांच्या या प्रक्षेपणामुळे जागतिक वाणिज्य बाजारात भारताने स्वतःला अत्यंत सशक्तपणे उभे केले आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नव्या संधींची दारे उघडली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in