नवी दिल्ली : भारताने चीनला लोकसंख्येबाबत मागे टाकले आहे का? अशी चर्चा जगभर होती, मात्र ती फोल ठरली आहे. खुद्द केंद्र सरकारने लोकसभेत भारताची लोकसंख्या १३९ कोटी असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, संयुक्त राष्ट्र, आर्थिक व सामाजिक विभाग, जागतिक लोकसंख्या विभाग २०२२ नुसार, चीनची लोकसंख्या १ जुलै २०२३ रोजी १ अब्ज ४२ कोटी, ५६ लाख, ७१ हजार अंदाजित होती. लोकसंख्येबाबत राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, १ जुलै २०२३ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३९ कोटी, २३ लाख २९ हजार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. केंद्र सरकारने २०२१ मध्ये जनगणना करण्यासाठी २८ मार्च २०१९ रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली होती, मात्र त्या वर्षी कोविड आल्याने जनगणना रोखण्यात आली.