संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली; अनेक लक्ष्य भेदणाऱ्या 'अग्नि प्राइम' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

या क्षेपणास्त्रात एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्थ करण्याची क्षमता असल्याचं सांगण्यात येत आहे.
संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली; अनेक लक्ष्य भेदणाऱ्या 'अग्नि प्राइम' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
Published on

संरक्षण क्षेत्रात भारत आणखी एक पाऊल पुढे सरकला आहे. भारतीय संशोधन आणि विकास संस्थेनं (DRDO) 'अग्नि प्राइम' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. 'अग्नि प्राइम' या क्षेपणास्त्राला 'अग्नि-पी' असं देखील म्हटलं जातं. संरक्षण मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. या क्षेपणास्त्रात एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्थ करण्याची क्षमता असल्याचं सांगण्यात येत आहे.

ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन 'अग्नि प्राइम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयानं निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. बुधवारी (7 जून) रात्री 7:40 वाजता एपीजे अब्दुल कलाम बेटावरील लॉन्चिंग कॉम्प्लेक्स 4 वरुन अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे मिसाईल पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असून लक्षाला उद्धवस्थ करायला सज्ज आहे.

काय आहेत 'अग्नि प्राईम' क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये?

'अग्नि प्राइम' या 11,000 किलो वजनाच्या क्षेपणास्त्रात 2,000 किमी पर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची लांबी 34.5 फूट असून त्यावर एक किंवा अनेक टार्गेटेबल रीएँट्री व्हेईकल वारहेड्स बसवता येतात. हे क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांना अचूक भेदू शकतं. तसंच याद्वारे उच्च-तीव्रतेची स्फोटकं आणि आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. 'अग्नि प्राइम' हे दुसऱ्या टप्प्यातील रॉकेट मोटर आधारित क्षेपणास्त्र असून यामध्ये 1,500 ते 3,000 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतात.

या क्षेपणास्त्राच्या चाचणीत त्यानं आपलं लक्ष्य अचूकपणे भेदत पूर्णपणे नष्ट करण्यात यश मिळवलं आहे. यामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील ताकद आणखी वाढणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in