मुंबई : स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ शुक्रवारी नौदलाच्या पश्चिम विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या सामरिक क्षमतेत वाढ झाली आहे, असे भारतीय नौदलाने सांगितले. आता भारतीय नौदलाकडे ‘आयएनएस विक्रांत’ व ‘आयएनएस विक्रमादित्य’ या दोन विमानवाहू युद्धनौका असतील.
सध्या या दोन्ही युद्धनौका नौदलाच्या कारवार येथील तळावर असतील. ही युद्धनौका कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बनवली आहे. या युद्धनौकेची लांबी २६२ मीटर असून रुंदी ६२ मीटर आहे. तिचे वजन ४५ हजार टन आहे. यावर ३६ विमाने व हेलिकॉप्टर राहू शकतात. ही युद्धनौका सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. या युद्धनौकेवर चार जीई गॅस टर्बाईन बसवले असून ते ८० मेगावॉट वीज निर्मिती करतील. या युद्धनौकेवरील कॉम्बट मॅनेजमेंट सिस्टीम ‘टाटा ॲॅडव्हान्स सिस्टीम’ कंपनीने बनवली आहे.