इंडिगोची आणखी १००० उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; विमान सेवा टप्प्याटप्प्याने होणार पूर्ववत

इंडिगो एअरलाइनची आज एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो विमान प्रवाशांचे सलग चौथ्या दिवशी अतोनात हाल झाले. या गैरसोयीबद्दल माफी मागतानाच, येत्या १० ते १५ डिसेंबरदरम्यान परिस्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा इंडिगो एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे.
इंडिगोची आणखी १००० उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; विमान सेवा टप्प्याटप्प्याने होणार पूर्ववत
इंडिगोची आणखी १००० उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; विमान सेवा टप्प्याटप्प्याने होणार पूर्ववत(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइनची आज एक हजारहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो विमान प्रवाशांचे सलग चौथ्या दिवशी अतोनात हाल झाले. या गैरसोयीबद्दल माफी मागतानाच, येत्या १० ते १५ डिसेंबरदरम्यान परिस्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा इंडिगो एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांच्या विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल वाढले आहेत.

दुर्दैवाने, गेल्या काही दिवसांत केलेल्या उपाययोजना पुरेशा ठरल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आज आमच्या सर्व प्रणाली आणि वेळापत्रकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत, परंतु उद्यापासून (शनिवारपासून) क्रमाक्रमाने सुधारणा करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कृतींमुळे, उद्या रद्द होणाऱ्या उड्डाणांची संख्या १,००० च्या खाली असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. विमान वाहतूक महासंचालनालयाने विशिष्ट 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' लागू करण्यामध्ये दिलेली तात्पुरती सूट खूप उपयुक्त ठरली आहे, असे ते म्हणाले. विमान वाहतूक नियामक संस्था असलेल्या डीजीसीएने नवीन 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स नियमांची अंमलबजावणी स्थगित ठेवली आहे.

अन्य कंपन्यांनी घेतला गैरफायदा

इंडिगोने गेल्या दोन दिवसांत ९०० हून अधिक उड्डाणे रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा इतर प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. इंडिगोमुळे विमानाचा प्रवास रद्द झालेल्या हजारो प्रवाशांना आता आकासा एअर, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यासारख्या कंपन्यांच्या अतोनात वाढलेल्या तिकीट दरांचा सामना करावा लागत आहे. मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू आणि चेन्नई-हैदराबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवर अचानक मागणी वाढल्यामुळे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये दोन ते चार पटीने वाढ केली आहे. ज्या मार्गावर सामान्यतः तिकीट ५,००० ते ७,००० च्या दरम्यान उपलब्ध होते, तिथे आता तात्काळ प्रवासासाठी १५,००० ते २०,००० इतका दर आकारला जात आहे. मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट ३०-३५ हजारांना मिळू लागले आहे. परतीचे तिकीट हवे असेल तर त्यासाठी ५९-६० हजार रुपये मोजावे लागत आहेत.

इंडिगोकडून माफी

यादरम्यान ‘इंडिगो’ने शुक्रवारी त्यांच्या ग्राहकांची सार्वजनिक माफी मागितली आहे. विमान कंपनीने,आम्ही खरंच माफी मागतो, आणि आम्ही काळजी घेऊ, असे शीर्षक असलेले एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये गेल्या काही दिवसांत प्रवाशांना सहन करावी लागलेली गैरसोय आणि मनस्ताप याची दखल घेण्यात आली आहे. तसेच सेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. इंडिगोने म्हटले आहे की, सर्व प्रभावित झालेल्या प्रवाशांना त्यांनी मूळ पेमेंट केलेल्या पद्धतीनुसार आपोआप रिफंड दिला जाईल. तसेच ५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ज्या प्रवाशांनी तिकिट रद्द केले आहे किंवा आणि प्रवासाची वेळ बदलली आहे अशा प्रवाशांना त्यासाठीचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

राहुल यांची टीका

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला. त्यांनी म्हटले आहे की, 'इंडिगोचे अपयश हे या सरकारच्या 'मक्तेदारी मॉडेल'चा परिणाम आहे. पुन्हा एकदा सामान्य भारतीयांना विलंब, उड्डाणे रद्द करणे आणि असहाय्यतेच्या रूपात किंमत मोजावी लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in