

नवी दिल्ली : केंद्रीय नागरी हवाई महासंचालनालयाने (डीजीसीए) डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर विमान फेऱ्या रद्द केल्याप्रकरणी 'इंडिगो' विमान कंपनीला २२.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाला झालेल्या गोंधळाबद्दल कडक इशारा देण्यात आला आहे.
३ ते ५ डिसेंबरदरम्यान इंडिगोची २,५०७ उड्डाणे रद्द तर १,८५२ विमाने उशीराने उडाली होती. त्याचा मोठा फटका लाखो प्रवाशांना बसला होता. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. देशांतर्गत हवाई वाहतूक ठप्प झाल्यानंतर सुमारे महिनाभराने ही कारवाई करण्यात आली आहे. 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन' (एफडीटीएल) नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयश आणि १० फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या सवलतींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
या दंडाव्यतिरिक्त, 'डीजीसीए'ने इंडिगोच्या 'ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर'चे (ओसीसी) वरिष्ठ उपाध्यक्ष जेसन हर्टर यांना तत्काळ पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. 'ओसीसी' व्यवस्थापनात 'गंभीर निष्काळजीपणा' केल्याचा ठपका ठेवत, भविष्यात त्यांना कोणत्याही 'जबाबदारी'च्या पदावर किंवा सुरक्षितता व ऑपरेशनल देखरेखीशी संबंधित भूमिकांमध्ये नेमणूक करण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. नव्या 'एफडीटीएल' नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे रोस्टरचे अचूक भाकीत व व्यवस्थापन करण्यात ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (ओसीसी) अपयशी ठरल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे नियामकाने नमूद केले.
'इंडिगो'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स आणि 'अकाउंटेबल मॅनेजर' सह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा पत्रे देण्यात आली आहेत. भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास वैयक्तिक पातळीवर अधिक कठोर कारवाई, परवाने निलंबित करण्यासह केली जाईल, असा इशारा या पत्रांमध्ये देण्यात आला आहे.
६० पानांहून अधिक असलेल्या तपास अहवालात असे नमूद केले की, मार्च २०२५ मध्ये इंडिगोकडे ५,४६३ वैमानिक होते, ती संख्या डिसेंबरपर्यंत सुमारे ५,०८५ पर्यंत घसरली. याच काळात वैमानिकांच्या विश्रांतीसंबंधी अधिक कडक नियम लागू झाले. इतर विमान कंपन्यांनी या बदलाशी जुळवून घेतले असताना, दररोज सुमारे २,३०० उड्डाणे चालवणाऱ्या इंडिगोने आवश्यक क्रूचा अंदाज जवळपास १५ टक्क्यांनी कमी लावल्याचे 'डीजीसीए'ने नमूद केले. त्यामुळे काही दिवसांत अर्ध्याहून अधिक ताफा जमिनीवरच थांबवावा लागला.
योग्य उपाययोजना करू – इंडिगो अध्यक्ष
इंडिगोची मूळ कंपनी 'इंटरग्लोब एव्हिएशन'चे अध्यक्ष व संचालक मंडळातील सदस्यांनी सांगितले की, ते योग्य त्या उपाययोजना विचारपूर्वक आणि वेळेत करतील. "या अडथळ्यानंतर इंडिगोच्या अंतर्गत प्रक्रियांची मजबुती आणि लवचिकता तपासण्यासाठी सखोल पुनरावलोकन सुरू असून, या अनुभवातून विमान कंपनी अधिक मजबूत होईल, याची खात्री केली जात आहे,' असे त्यांनी सांगितले.