

नवी दिल्ली : देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोची सेवा गेल्या आठवड्याभरापासून कोलमडली आहे. गेल्या १० दिवसांत आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. झाल्या प्रकाराबाबत माफी मागून इंडिगोने ही स्थिती पूर्वपदावर आणणार असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर प्रवाशांची नाराजी दूर करण्यासाठी आता इंडिगोने नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. त्यासाठी प्रवाशांना १० हजार रुपयांचे ‘व्हाऊचर गाजर’ दाखवण्यात आले आहे.
विमानाच्या गोंधळानंतर इंडिगोने गुरुवारी प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेत सर्वाधिक प्रभावित झालेल्या प्रवाशांना १० हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त अचानक रद्द झालेल्या विमानांच्या प्रवाशांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सरकारी निर्देशानुसार रद्द केलेल्या विमानांसाठी ५ ते १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त भरपाई प्रवाशांना दिली जाणार आहे, अशी माहिती इंडिगोने ‘एक्स’वर दिली आहे.
“ग्राहकांची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी काही अडचणीनंतर रद्द झालेल्या विमानांसाठी आता प्रवाशांना सर्व परतावे देण्यात येत आहेत. आम्हालादेखील हे मान्य करावे लागेल की ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२५ रोजी आमचे काही ग्राहक अनेक विमानतळांवर अडकून पडले होते. त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आमच्या अडचणींमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांसाठी आम्ही १० हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देणार आहोत. हे ट्रॅव्हल व्हाउचर पुढील एका वर्षांसाठी कोणत्याही भविष्यातील इंडिगोच्या प्रवासासाठी प्रवाशांना ते वापरता येणार आहे,” अशी माहिती इंडिगोने निवेदनात दिली आहे.
प्रवाशांना आलेल्या या अडचणींची दखल घेत इंडिगो या विमानवाहतूक कंपनीने तीन ते पाच डिसेंबरपर्यंत विमानप्रवासात अडचण आलेल्या सर्व प्रवाशांना १० हजार रुपयांचे ट्रॅव्हल व्हाऊचर जाहीर केले आहे. या व्हाऊचरची मुदत १२ महिन्यांपर्यंत असेल.
ज्या प्रवाशांच्या प्रवासामध्ये एकापेक्षा जास्त बदल अर्थात फ्लाईट पुन्हा पुन्हा रिशेड्यूल झाले किंवा ज्यांना विमानतळावर खूप जास्त वेळ वाट पाहावी लागली, अशा प्रवाशांना १० हजार रुपयांच्या किमतीचे ट्रॅव्हल व्हाऊचर दिले जातील, असे इंडिगोने जाहीर केले. यासंदर्भात प्रवाशांनी त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवर पाठवलेले संदेश तपासावे, जेणेकरून नुकसानभरपाई आणि व्हाऊचर मिळण्याच्या प्रक्रियेत मदत होईल, असेही इंडिगोने स्पष्ट केले.
‘डीजीसीए’कडून सीईओंची दोन तास चौकशी
‘डीजीसीए’च्या चौकशी समितीने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची दोन तास चौकशी केली. दोन तासांच्या या उच्चस्तरीय बैठकीत एअरलाइनच्या कामकाजावर, परतफेडीवर, क्रू व्यवस्थापनावर आणि भरपाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंडिगोने त्यांच्या नवीन रोस्टर प्लॅनवर, परतफेडीची प्रगती, सामानाचा शोध आणि उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत तपशीलवार माहिती दिली. आता शुक्रवारी पुन्हा एकदा इंडिगोच्या सीईओंना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.