IndiGo ची ६५० उड्डाणे रद्द; १,६५० उड्डाणे सुरू झाल्याचा कंपनीचा दावा

गेल्या सहा दिवसांपासून ‘इंडिगो’च्या कारभारातील गोंधळ सुरूच असून रविवारी ६५० उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल अद्यापि सुरूच आहेत. तर १,६५० उड्डाणे सुरू केल्याचे कंपनीने जाहीर केले असून येत्या १० डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
IndiGo ची ६५० उड्डाणे रद्द; १,६५० उड्डाणे सुरू झाल्याचा कंपनीचा दावा
IndiGo ची ६५० उड्डाणे रद्द; १,६५० उड्डाणे सुरू झाल्याचा कंपनीचा दावा
Published on

मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून ‘इंडिगो’च्या कारभारातील गोंधळ सुरूच असून रविवारी ६५० उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल अद्यापि सुरूच आहेत. तर १,६५० उड्डाणे सुरू केल्याचे कंपनीने जाहीर केले असून येत्या १० डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. तसेच कंपनीने रविवारी ६१० कोटी रुपयांच्या तिकिटांचा परतावा प्रवाशांना दिला, तर ३ हजार प्रवाशांचे सामान परत केले.

दरम्यान, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार शनिवारी सहा मेट्रो विमानतळांवरील इंडिगोची ‘ऑन-टाइम परफॉर्मन्स’ २०.७ टक्क्यांपर्यंत सुधारली. शनिवारी विमान कंपनीने सुमारे १,५०० उड्डाणे केली, तर सुमारे ८०० उड्डाणे रद्द केली होती.

गेल्या काही दिवसांत झालेल्या विस्कळीतपणामुळे कंपनीची शेकडो उड्डाणे रद्द आणि उशिराने झाली, ज्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

‘आम्ही आमच्या नेटवर्कमध्ये अधिक महत्त्वपूर्ण सुधारणा करत आहोत. रविवारी आम्ही १,६५० पेक्षा जास्त उड्डाणे करण्याच्या मार्गावर आहोत, जी शुक्रवारच्या सुमारे १,५०० उड्डाणांपेक्षा अधिक आहेत. कंपनी उड्डाण वेळापत्रक पुनर्संचयित करण्यात आणि ग्राहक सहाय्य व्यवस्था मजबूत करण्यात प्रगती करत आहे. थेट किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने केलेल्या बुकिंग्ससाठी परतावा आणि सामानाशी संबंधित प्रक्रिया सुरू आहे. विमानतळाकडे जाण्यापूर्वी वेबसाइटवर अद्ययावत उड्डाण स्थिती तपासावी. पूर्णपणे सामान्य स्थितीकडे जलदगतीने परतण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत आणि संबंधित सर्व घटकांसोबत जवळून काम करत आहोत,” असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

इंडिगोच्या इतिहासात ५ डिसेंबर हा दिवस सर्वात कठीण ठरला होता. न्यायालयीन आदेशानुसार लागू झालेल्या फ्लाइट ड्युटी आणि विश्रांती कालावधीच्या नवीन नियमांच्या दुसऱ्या टप्प्यानंतर कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आणि सुमारे १,६०० उड्डाणे रद्द करावी लागली. हे नियम सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी लागू असले तरी ‘डीजीसीए’ने इंडिगोला तात्पुरती सवलत दिली आहे.

कंपनीचा ‘क्रायसेस मॅनेजमेंट ग्रुप’ स्थापन

इंडिगोने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, त्यांची पालक कंपनी ‘इंटरग्लोब एव्हिएशन’च्या संचालक मंडळाने ‘क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप’ स्थापन केला आहे. जो परिस्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी बैठक घेत आहे. कंपनीचे संचालक मंडळ ग्राहकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना परतावा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

संसदीय समिती विमान कंपन्यांना समन्स पाठवणार

नवी दिल्ली : ‘इंडिगो’ विमान सेवा विस्कळीत झाल्याने देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे संसदीय समिती खासगी विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि नागरी विमान वाहतूक नियामकांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे. परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि जदयू नेते संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील समिती विमान कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, विमान वाहतूक महासंचालक व नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून सेवेत झालेला निष्काळजीपणा आणि त्यावरील उपाययोजना याबाबत स्पष्टीकरण मागणार आहे.

जबाबदारी निश्चित करणार - मोहोळ

पुणे : ‘इंडिगो’च्या सेवेतील कमतरतेमुळे प्रवाशांना मानसिक छळ आणि मनस्ताप सहन करावा लागत असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘सर्व प्रवाशांनी मानसिक त्रास सहन केला आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. चार सदस्यीय समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. घडलेल्या प्रकाराबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल आणि कुणालाही सोडणार नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in