IndiGo चा गोंधळ सुरूच; सातव्या दिवशीही ५०० पेक्षा जास्त विमाने रद्द

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या विमानसेवेचा सावळागोंधळ अद्याप सुरूच असून सातव्या दिवशीही सोमवारी ५००पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.
IndiGo चा गोंधळ सुरूच; सातव्या दिवशीही ५०० पेक्षा जास्त विमाने रद्द
Published on

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या विमानसेवेचा सावळागोंधळ अद्याप सुरूच असून सातव्या दिवशीही सोमवारी ५००पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. विमान रद्द करण्याचे संकट सलग सातव्या दिवशीही कायम असल्याने चेन्नई, हैदराबाद आणि दिल्ली या प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवाशांना तासन‌्तास विमानतळांवर ताटकळत राहावे लागले. गेल्या सात दिवसांत ४,५००पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द झाल्यानंतर आता इंडिगो एअरलाइन्सने १० डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या मंगळवारपासून सुरू झालेली विमानसेवा विस्कळीत होण्याची मालिका सोमवारी सातव्या दिवशीही कायम आहे. यामुळे प्रवाशांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक ठिकाणी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकट्या दिल्ली विमानतळावर एकूण १३४ विमाने रद्द झाली. यात दिल्लीतून जाणाऱ्या ७५ आणि दिल्लीत येणाऱ्या ५९ फ्लाईट्सचा समावेश आहे. याशिवाय, बेंगळुरूत १२७ तर चेन्नई विमानतळावर ७१ विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. तर, अहमदाबादमध्ये २० आणि विशाखापट्टणममध्ये ७ तर मुंबईतूनही ९ विमान उड्डाणे रद्द झाल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी एक खास सूचना जारी केली आहे. 'इंडिगो'च्या फ्लाईट्समध्ये आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाइन्सकडून विमानाचा लेटेस्ट स्टेटस तपासावा,' असा महत्त्वाचा सल्ला यात देण्यात आला आहे. इंडिगोच्या या गोंधळामुळे अनेक प्रवाशांना मोठा पटका बसला असून अनेकांचे नुकसान झाले आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित प्रवाशांना ६१० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा तिकिट रिफंड देण्यात आला आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले की, “फ्लाईट रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वेळेच्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा झाली आहे आणि ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समर्थन प्रक्रिया आणखी मजबूत केली जात आहे.”

कठोर कारवाई करणार - केंद्रीय मंत्री नायडू

इंडिगोच्या अलिकडच्या घटनांवर सरकार कठोर भूमिका घेईल. अशा घटना पुन्हा कधीही घडू नयेत, यासाठी सर्व विमान कंपन्यांवर वचक बसावा, यासाठी केंद्र सरकार यासंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. विमानाला विलंब किंवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी कडक नागरी विमान वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत. सर्व विमान कंपन्यांनी त्यांचे पालन करावे. सॉफ्टवेअर बिघाडाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स’ नियम लागू करण्यापूर्वी आम्ही १ डिसेंबरला इंडिगोसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी नियमांमधील बदलांबद्दल सरकारने माहिती दिली होती. तेव्हा त्यांनी त्यावर आक्षेप घेतला नव्हता. अचानक, ३ डिसेंबरला उड्डाणे रद्द करण्यास सुरुवात झाली. सरकारने याची तत्काळ दखल घेतली आहे, असे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in