Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ वर अपघात; छत कोसळल्याने ६ लोक जखमी, एकाच मृत्यू

Delhi airport’s T-1 collapses: शुक्रवारी, २८ जून रोजी दिल्ली-एनसीआरला मुसळधार पावसाने तडाखा बसला आणि यामुळे दिल्ली विमानतळाच्या छताचा भाग कोसळण्याची घटना घडली.
indira gandhi international airport terminal 1 terminal 1 roof collapse
ANI

Indira Gandhi International Airport: राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे देशातील सर्वात मोठे विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज भीषण अपघात झाला. विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या छताचा एक भाग कोसळला असून त्यामुळे आतापर्यंत ६ जण जखमी तर एकाच मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक कार आणि टॅक्सी गाडल्या गेल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. "सकाळी ५.३० च्या सुमारास, आम्हाला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ वर छत कोसळल्याचा कॉल आला. तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत," असे दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

शोध मोहीम अजूनही सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे उपस्थित असलेल्या वाहनांमध्ये कोणी अडकले नाही ना हे तपासले जात आहे. छतावरील पत्र्याव्यतिरिक्त, सपोर्ट बीम देखील कोसळला होता. त्यामुळे टर्मिनलच्या पिकअप आणि ड्रॉप भागात उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उड्डाणे रद्द

या अपघातानंतर, टर्मिनल १ वरून निघणारी आणि येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मुसळधार पाऊस हे छत कोसळण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतील रस्ते आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात पूर आणि पाणी साचले आहे.

दिल्ली आणि एनसीआरमध्ये शुक्रवारी पहाटे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह संततधार पाऊस झाला. गुरुवारी, दिल्लीच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील विविध भागांमध्ये तीव्र पाणी साचण्याच्या समस्या दिसून आल्या. दक्षिण दिल्लीतील गोविंदपुरी परिसर आणि नोएडा सेक्टर ९५ मध्ये पाणी साचल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in