थिरुवनंतपुरम : केरळमधील भाजपचे पहिले खासदार व केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत आहेत. आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ‘मदर ऑफ इंडिया’ होत्या, तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री के. के. करुणाकरन व ई. के. नयनार हे आपले राजकीय गुरू असल्याचे सांगून खळबळ माजवली आहे.
गोपी हे नुकतेच पुन्नकुन्नम येथील करुणाकरन यांच्या स्मारकावर श्रद्धांजली वाहायला गेले होते. तेव्हा ते म्हणाले की, मी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी ‘मदर ऑफ इंडिया’ मानतो. मी माझे राजकीय गुरू करुणाकरन यांना श्रद्धांजली अर्पण करायला आलो. ते एक साहसी मुख्यमंत्री होते. पण, माझ्या विधानाचा राजकीय अर्थ काढू नका, असे सांगायला गोपी विसरले नाहीत. सुरेश गोपी हे मार्क्सवादी नेते ई. के. नयनार यांच्या निवासस्थानीही गेले.
केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर गोपी यांच्याकडे पेट्रोलियम व पर्यटन राज्याचा कार्यभार स्वीकारला. पण, मला मंत्री बनायचे नव्हते. मला केवळ खासदार म्हणून काम करायचे होते, असे दावा एका मल्ल्याळम् वाहिनीने गोपीच्या यांच्या हवाल्याने दिला होता. मात्र यातून वाद उमटल्यानंतर गोपी यांनी सारवासारव केली.