
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील स्नेह नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळले. यामध्ये दुर्घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली असून १९ जण जखमी झाले आहेत.
तसेच, जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. तसेच, या घटनेची चौकशी केली जाईल, असेदेखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींची मदतही जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, "इंदूरमधील दुर्घटनेमुळे अत्यंत दुःख झाले. मुख्यमंत्री चौहान शिवराज यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत असून माझी प्रार्थना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे," असे म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.
तसेच, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीदेखील शोक व्यक्त करत मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे.