गोव्यात विदेशी पर्यटकांचा ओघ खुंटला; रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा परिणाम

सध्या राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा १६ टक्के आहे.
गोव्यात विदेशी पर्यटकांचा ओघ खुंटला; रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा परिणाम

पणजी : रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल संघर्ष यामुळे या देशांमधून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा नियमित ओघ कमी झाला आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी म्हटले आहे.

किनारपट्टीवरील राज्यातील पर्यटनवाढीसाठी गोव्याच्या नवीन उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते बुधवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, रशिया, युक्रेन आणि इस्रायल हे असे तीन देश आहेत, जेथून गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र तेथील या संघर्षामुळे त्या देशातील पर्यटकांचा गोव्यातील ओघ लक्षणीय कमी झाला आहे. यामुळे निर्माण झालेल्या पोकळीवर मात करण्यासाठी गोवा कसा प्रयत्न करत आहे हे सांगताना ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या बघितली तर ती मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. यावरून देशांतर्गत पर्यटकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही निर्माण झालेली पोकळी भरत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात सरासरी आठ दिवस मुक्काम करतात, तर देशी पर्यटकांचा मुक्काम चार दिवस असतो, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे ते म्हणाले.

गोवा सरकारने आपल्या काही अनोख्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन दिल्याने, राज्याला पर्यटकांच्या ओघामध्ये सातत्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. सध्या राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा १६ टक्के आहे. येत्या तीन वर्षांत तो २० ते २४ टक्क्यांपर्यंत वाढावा अशी आमची इच्छा आहे, असे खौंटे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in