
बंगळुरूतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) चे माजी संचालक बलराम यांच्यासह इतर 16 जणांविरुद्ध (एकूण 18) एससी/एसटी (SC/ST) अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 71 व्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या (सीसीएच) निर्देशांनुसार सदाशिव नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार दुर्गाप्पा हे आदिवासी बोवी समुदायातील असून ते IISC येथील सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक होते. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार दुर्गाप्पा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते आयआयएससीमध्ये सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक होते. 2014 मध्ये त्यांना एका बनावट हनी ट्रॅप प्रकरणात गुंतवण्यात आले. नंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. तसेच जातीयवादी शिवीगाळ करून धमक्या देण्यात आल्या.
या प्रकरणात आरोपी असलेल्या इतर व्यक्तींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संद्या विश्वेश्वरैह, हरी के व्ही एस, दासप्पा, बलराम पी, हेमलता म्हशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे. याप्रकरणी अद्याप तरी गोपालकृष्णन यांनी कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
कोण आहेत क्रिस गोपालकृष्णन?
क्रिस गोपालकृष्णन हे इन्फोसिसच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी 2007 ते 2011 पर्यंत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते 2011 ते 2014 पर्यंत इन्फोसिसचे उपाध्यक्ष होते.
ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (ओआयएसटी) च्या गव्हर्नर्स बोर्डवर काम करतात. ते आयआयएससी बंगळुरूच्या कौन्सिलचे आणि आयआयटी-बंगळुरूच्या गव्हर्नर्स बोर्डाचे अध्यक्ष आहेत. तसेच, कर्नाटक सरकारच्या माहिती तंत्रज्ञानावरील व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही ते सांभाळतात. याशिवाय, आरबीआयएच (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब) आणि सीआयआय सेंटर ऑफ एक्सलन्स इन इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप अँड स्टार्ट-अप्स (सीआयईएस) चेही ते अध्यक्ष आहेत. जानेवारी 2011 मध्ये, भारत सरकारने गोपालकृष्णन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.