

निस : भारताच्या ‘डीएनए’मध्येच नावीन्यता खोलवर रुजलेली आहे आणि सध्याची डिजिटल क्रांती ही याच खोलवर रुजलेल्या शोधवृत्तीची आधुनिक प्रचिती आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत ‘भारत इनोव्हेट्स २०२६’ या परिषदेचे उद्घाटन केले.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि स्टार्टअप संस्थापकांच्या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारताच्या वेगवान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे वर्णन आपल्या प्राचीन वारशाचा ऐतिहासिक विस्तार म्हणून केले. आधुनिक ‘स्टार्टअप इकोसिस्टम’ला भारताच्या भूतकाळाशी जोडताना, पंतप्रधान मोदींनी प्राचीन ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञान यांमध्ये थेट संबंध जोडला.
त्यांनी गणित आणि खगोलशास्त्रातील सुरुवातीच्या प्रगतीपासून ते वैद्यकशास्त्र आणि योगाच्या शाश्वत पद्धतींचा उल्लेख केला आणि या यशाचे वर्णन मानवतेसाठी पायाभूत असल्याचे केले.
प्राचीन वारशाचा आधुनिक विस्तार
हजारो वर्षांपासून भारताने नवनवीन शोधांनी आणि ज्ञानाने जगाला मार्गदर्शन केले आहे. गणितापासून खगोलशास्त्रापर्यंत आणि वैद्यकशास्त्रापासून योगापर्यंत, भारताचे योगदान संपूर्ण मानवतेसाठी पायाभूत राहिले आहे. आज आपण याच समृद्ध वारशाचा पाया घेऊन त्याला नवी दिशा आणि गती देत आहोत," असे ते म्हणाले.
सर्वांसाठी ‘एआय’ आणि मानवी कल्याण
पंतप्रधानांनी सांगितले की, हा बदल आर्थिक नसून मानवी कल्याणाच्या वचनबद्धतेवर आधारित आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील भारताचे शोध हे ‘सर्वसमावेशक एआय’ या संकल्पनेखाली तयार केले गेले आहेत, जेणेकरून डिजिटल परिवर्तनाचे रूपांतर सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक स्थिरतेमध्ये होईल.
आज भारताचे सर्वोच्च प्राधान्य मानवाची सेवा करणाऱ्या तंत्रज्ञानाला म्हणजेच लोकांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नाविन्यतेला आहे. याच मार्गदर्शक तत्त्वाने आपल्या डिजिटल क्रांतीला गती दिली आहे आणि हेच भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या केंद्रस्थानी आहे. आपली ‘एआय’ची दृष्टी ‘सर्वसमावेशक ‘एआय’ या संकल्पनेवर आधारित आहे, जी प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी समर्पित आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले.
भारत-फ्रान्समध्ये सहकार्य दृढ करण्याबाबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फ्रान्समधील ‘नीस’ शहरात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य-तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी यांसारख्या क्षेत्रांत दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली.
भारत तंत्रज्ञान पुरवणारा देश बनला
मोदी म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी जग भारताकडे प्रामुख्याने तंत्रज्ञान स्वीकारणारा देश म्हणून पाहत होते. मात्र, आज भारत वेगाने तंत्रज्ञान पुरवणारा देश म्हणून उदयास येत आहे. भारतातून निर्माण होणाऱ्या नवनवीन कल्पना आणि उपायांमध्ये मानवतेच्या एका मोठ्या भागाला लाभ देण्याची क्षमता आहे. ‘भारत इनोव्हेट्स’ हाच दृष्टिकोन मांडतो. जागतिक नावीन्यतेचा पुढील अध्याय भारतासोबत मिळून लिहिण्यासाठी आणि सहकार्यासाठी हे जगाला दिलेले निमंत्रण आहे," असे ते म्हणाले.