आजपासून INS Arighat नौदल ताफ्यात! भारताची दुसरी आण्विक पाणबुडी; ‘न्यूक्लियर ट्रायड’च्या दिशेने मोठे पाऊल

भारताची दुसरी आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ गुरुवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ‘आयएनएस अरिघात’ २०१७ मध्ये लाँच करण्यात आली, तेव्हापासून या पाणबुडीच्या विविध चाचण्या सुरू होत्या. ‘आयएनएस अरिघात’ ही ‘आयएनएस अरिहंत’ची अपग्रेडेड आवृत्ती आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

विशाखापट्टणम : भारताची दुसरी आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ गुरुवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ‘आयएनएस अरिघात’ २०१७ मध्ये लाँच करण्यात आली, तेव्हापासून या पाणबुडीच्या विविध चाचण्या सुरू होत्या. ‘आयएनएस अरिघात’ ही ‘आयएनएस अरिहंत’ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. ‘आयएनएस अरिहंत’ २००९ साली भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली होती.

भारताची दुसरी आण्विक पाणबुडी ‘अरिघात’ विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात बांधण्यात आली आहे. ‘अरिहंत’प्रमाणेच ‘अरिघात’देखील ७५० किमी पल्ल्याच्या के-१५ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील होईल.

या दोन आण्विक पाणबुड्यानंतर भारतीय नौदल आणखी दोन पाणबुड्या आपल्या ताफ्यात सामील करणार असून त्या २०३५-३६ सालापर्यंत तयार होतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय नौदलाने आतापर्यंत ३ आण्विक पाणबुड्या तयार केल्या आहेत. यापैकी एक ‘अरिहंत’ कार्यान्वित झाली आहे, दुसरी ‘अरिघात’ नौदलात सामील होणार आहे आणि तिसऱ्या ‘एस-३’ची चाचणी सुरू आहे. या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्रे डागता येणे शक्य होणार आहे. ‘अरिघात’ ही पूर्णत: भारतीय बनावटीची पाणबुडी असून भारतीय नौदलाची समुद्रावरील ताकद यामुळे वाढणार आहे.

या ‘अरिहंत’ श्रेणीतील पाणबुड्या २००९ मध्ये लॉन्च करण्यापूर्वी भारताने हा प्रकल्प जगापासून लपवून ठेवला होता. १९९० मध्ये भारत सरकारने ‘एटीव्ही’ म्हणजेच ‘प्रगत तंत्रज्ञान जहाज कार्यक्रम’ सुरू केला. त्याअंतर्गत या पाणबुड्या बांधण्याचे काम सुरू झाले होते.

भारत बनणार ‘न्यूक्लियर ट्रायड’ देश

जमिनीवरून क्षेपणास्त्राद्वारे, हवेतून लढाऊ विमानांद्वारे आणि समुद्रातून पाणबुड्यांद्वारे अण्वस्त्रे डागण्याच्या क्षमतेला ‘न्यूक्लियर ट्रायड’ असे म्हणतात. भारताने ‘आयएनएस अरिहंत’ श्रेणीतील आण्विक पाणबुड्यांची उभारणी केल्यामुळे अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन व्यतिरिक्त भारत हा जगातील सहावा ‘न्यूक्लियर ट्रायड’ देश बनणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in