
विशाखापट्टणम : भारतीय नौदलाच्या ताफ्यात मंगळवारी 'आयएनएस हिमगिरी' आणि 'आयएनएस उदयगिरी' या दोन नव्या युद्धनौका दाखल झाल्याने नौदल आणखी सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे. या दोन्ही युद्धनौकांच्या तैनातीमुळे नौदलाच्या लढाऊ क्षमतेला चालना मिळणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम येथील नौदल तळावर या युद्धनौकांच्या समावेशाचा समारंभ पार पडला.
या दोन्ही स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका असून त्यांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की त्या शत्रूच्या रडार, इन्फ्रारेड आणि ध्वनी सेन्सर्सपासून वाचतील. त्यांना इंडो-पॅसिफिक प्रदेशात तैनात केले जाईल, ज्यामुळे नौदलाची ताकद वाढेल.
दोन्ही युद्धनौका 'ब्रह्मोस' सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि भारत-इस्त्रायल 'बराक-८' लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीने सुसज्ज आहेत. त्यांच्याकडे समुद्री युद्धात ७६ मिमी नौदल तोफा आणि पाण्याखालील टॉर्पेडो स्फोटक शस्त्रे देखील आहेत.
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे 'उदयगिरी' आणि कोलकातामधील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सद्वारे 'हिमगिरी' ही युद्धनौका बांधली गेलेली आहे. 'उदयगिरी' ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोद्वारे डिझाइन केलेले १०० वे जहाज आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्हीही युद्धनौका बांधताना ७५ टक्के स्वदेशी सामग्री वापरण्यात आलेली आहे.
नवीन फ्रिगेट्सना 'आयएनएस उदयगिरी' (एफ ३५) आणि 'आयएनएस हिमगिरी' (एफ ३४) असे नाव देण्यात आले आहे. या फ्रिगेट्समध्ये एकत्रित डिझेल किंवा गॅस, प्रोपल्शन सिस्टम, एकात्मिक प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम आणि प्रगत शस्त्रे व सेन्सर्सचा समावेश आहे. ज्यापैकी बहुतेक भारतीय उत्पादकांनी विकसित केलेले आहे.
'प्रोजेक्ट १७ ए'चा भाग
नौदलात समावेश झालेल्या 'उदयगिरी' आणि 'हिमगिरी' या दोन्ही युद्धनौका या प्रगत 'प्रोजेक्ट १७ए' क्लासचा भाग आहेत. तसेच ब्लू वॉटर ऑपरेशन्समध्ये वेगवेगळ्या मिशन्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या आहेत. ही जहाजे दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधली गेलेली आहेत. तसेच दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन युद्धनौका एकत्रितपणे सेवेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.