नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस महेंद्रगिरी' दाखल; सागरी सुरक्षा अधिक भक्कम - ‘माझगाव डॉक’ने बनवली अत्याधुनिक युद्धनौका

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) द्वारेनिर्मित 'आयएनएस महेंद्रगिरी' या अत्याधुनिक युद्धनौकेचा (स्टेल्थ फ्रिगेट) शनिवार, ११ जुलैला विशाखापट्टणम येथे नौदलात औपचारिक समावेश करण्यात आला.
नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस महेंद्रगिरी' दाखल; सागरी सुरक्षा अधिक भक्कम - ‘माझगाव डॉक’ने बनवली अत्याधुनिक युद्धनौका
नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस महेंद्रगिरी' दाखल; सागरी सुरक्षा अधिक भक्कम - ‘माझगाव डॉक’ने बनवली अत्याधुनिक युद्धनौका(Photo - X)
Published on

मुंबई : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) द्वारेनिर्मित 'आयएनएस महेंद्रगिरी' या अत्याधुनिक युद्धनौकेचा (स्टेल्थ फ्रिगेट) शनिवार, ११ जुलैला विशाखापट्टणम येथे नौदलात औपचारिक समावेश करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्याच्या भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

स्वदेशी नौदल अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण

'प्रोजेक्ट १७ए' अंतर्गत बांधण्यात आलेली 'आयएनएस महेंद्रगिरी' ही नीलगिरी श्रेणीतील चौथी युद्धनौका असून ती स्वदेशी नौदल अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या नौकेची मूळ रचना भारतीय नौदलाच्या'वॉरशिप डिझाईन ब्युरो 'ने तयार केली आहे तर सविस्तर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधणी मुंबईतील माझगाव डॉकने केली आहे. बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर वॉरशिप ओव्हरसीइंग टीमने (मुंबई) बारीक लक्ष ठेवून नौदलाच्या कडक मानकांची पूर्तता केली.

वेग, क्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञान

१४९ मीटर लांब आणि १७.८ मीटर रुंद असलेल्या या युद्धनौकेचे वजन सुमारे ६,४०० टन आहे. यामध्ये अत्याधुनिक 'कम्बाइंड डिझेल किंवा गॅस' प्रणोदन यंत्रणा बसवण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन गॅस टर्बाइन आणि दोन मुख्य डिझेल इंजिनचा समावेश आहे. यामुळे ही युद्धनौका २८ नॉट्सपेक्षा (नॉटिकल मैल) अधिक वेगाने समुद्रात धावू शकते. शत्रूच्या रडारला गुंगारा देणारे स्टेल्थ तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रणाली, आधुनिक सेन्सर्स आणि ऑटोमेशन यंत्रणांमुळे ही युद्धनौका युद्धकाळात प्रभावी ठरेल.

नौदलाला ५ युद्धनौका, १ पाणबुडी सुपूर्द

आपली अफाट क्षमता सिद्ध करत माझगाव डॉकने अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीत भारतीय नौदलाला ५ युद्धनौका आणि १ पाणबुडी सुपूर्द केली आहे. विशेष म्हणजे, एसआरजीएम, एके-६३०, ब्रह्मोस आणि कवच यांसारख्या प्रमुख लढाऊ यंत्रणा नौकेच्या वितरणापूर्वीच पूर्णपणे सज्ज करण्यात आल्या होत्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in