इंडियाऐवजी भारत नव्या वादास तोंड फुटले

विरोधकांनी याला तीव्र आक्षेप घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे
इंडियाऐवजी भारत  नव्या वादास तोंड फुटले
Published on

नवी दिल्ली : जी-२० राष्ट्रगटाच्या नवी दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेस उपस्थित राहणाऱ्या जागतिक प्रतिष्ठेच्या पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या शिष्टाचार भोजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्र सरकारने इंग्रजीतील ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख केला. विरोधकांनी याला तीव्र आक्षेप घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.

राष्ट्रपतींतर्फे जी-२० राष्ट्रसमूहाच्या प्रतिष्ठितांना भव्य भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी देण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेवर इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. इंडियाचा भारत उल्लेख करण्याला कॉंग्रेससह अन्य सर्व विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये भारताच्या संघराष्ट्र रचनेवर आघात केले जात आहेत, असा आरोप केला आहे. कॉंग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी घटनेचे कलम नंबर १ वाचताना आता भारत जे पूर्वी इंडिया होते ते संघराष्ट्र असेल असे म्हणावे लागेल, असे एक्स केले आहे. मात्र यातील संघराष्ट्रावर आता आघात होत आहेत, असे रमेश यांनी आपल्या एक्स खात्यात प्रसिद्ध केले आहे. जी-२० शिखर संमेलन येत्या ९ सप्टेंबरपासून राजधानी नवी दिल्लीत सुरू होत आहे. ९ आणि १० सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या या शिखर संमेलनाचे अध्यक्षपद यंदा भारताकडे असून २० देशांचे प्रमुख अथवा अन्य मोठे नेते या संमेलनास हजर राहणार आहेत. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि इंडिया आघाडीतील एक प्रमुख नेते शरद पवार यांनी देशाचे नाव बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही, असे म्हटले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत या नामबदल विषयावर खल केला जार्इल, असेही पवार यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीत एकूण २८ पक्ष सहभागी आहेत. सत्ताधारी पक्ष देशाशी संबंधित नावे का बदलत आहे हेच मला समजत नाही, असा सवाल देखील पवार यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेस प्रमुख आणि इंडिया आघाडीतील मोठ्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भारत या नावाला आक्षेप घेताना अचानक इंडियाला असे काय घडले ज्यामुळे त्याचे भारत करावे लागले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. संपूर्ण जग भारताला इंडिया या नावाने ओळखत आहे. आपण सर्वच इंडियाला भारत म्हणतो, त्यात नवे ते काय? इंग्रजीत आपण इंडिया म्हणतो. तेव्हा नवे करण्यासारखे काहीच नाही, अशी पुस्तीदेखील ममता यांनी जोडली आहे.

तसेच पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, भाजप आपल्या बहुमताचा वापर संपूर्ण देश आपली जहागीरदारी असल्यासारखा करीत आहे. त्यांच्या या कृतीतून भाजपची असहिष्णूता आणि क्षुल्लकपणा दिसून येत आहे.

विष्णु पुराणातील श्लोकात 'भारत'

राष्ट्रपती भवनातील जी २० शिखर परिषदेच्या डिनरचे निमंत्रण 'भारताचे राष्ट्रपती' यांच्या नावाने पाठवले जात असल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की "भारताचे संविधान सांगते की 'इंडिया म्हणजेच भारत आहे'. संविधानाने आपल्या भूमीला भारत हे नाव दिलेले नाही, ते आपल्या पूर्वजांनी दिले आहे. विष्णु पुराणातील एका श्लोकात लिहिले आहे, 'उत्तरम् यत् समुद्रस्य हिमाद्रेशैव दक्षिणम् आणि हिमालयाच्या दक्षिणेकडील भूमीचे नाव भारत आहे. त्यात राहणार्‍या लोकांचे नाव भारती आहे. आता विष्णु पुराणावर कोणी आक्षेप घेऊ शकेल का?"

logo
marathi.freepressjournal.in