'दाना' चक्रीवादळाची तीव्रता ओसरली

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून तुफान पर्जन्यवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याचे आणि विजेचे खांब कोसळण्याचे प्रकार घडले.
'दाना' चक्रीवादळाची तीव्रता ओसरली
पीटीआय
Published on

भुवनेश्वर/कोलकाता : 'दाना' चक्रीवादळ भितरकनिका आणि धामरा यामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास धडकले. मात्र, या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने ओदिशा आणि पश्चिम बंगालला त्याचा विशेष फटका बसला नाही. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून तुफान पर्जन्यवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याचे आणि विजेचे खांब कोसळण्याचे प्रकार घडले. विमानांची उड्डाणे आणि रेल्वेसेवा सकाळपासून नियमितपणे सुरू राहिली.

या चक्रीवादळात एकही जण मृत्युमुखी पडू नये अशा प्रकारचे खबरदारीचे उपाय आखण्याच्या सूचना ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी दिल्या होत्या. त्यामध्ये यश आल्याचे मांझी म्हणाले. तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

भुवनेश्वरमध्ये मांझी यांनी स्थितीचा आढावा घेतला, राज्यात चक्रीवादळामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे आपली मोहीम यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये केबलचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला, सखल भागातून २.१६ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in