आंतरराष्ट्रीय व्यापार भारतीय चलनामध्ये होणार,आरबीआयची नवीन प्रणाली

जागतिक बाजारपेठेतल्या सर्व निर्बंधानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.
आंतरराष्ट्रीय व्यापार भारतीय चलनामध्ये होणार,आरबीआयची नवीन प्रणाली
Published on

रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात होताच भारतीय चलनावर अमेरिकी डॉलरचा दबाव वाढू लागला. जागतिक बाजारपेठेतल्या सर्व निर्बंधानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) एक नवीन प्रणाली विकसित करत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार रुपया या भारतीय चलनात करण्यासाठी नवीन प्रणाली तयार करण्यात येत असल्याचे`आरबीआय`ने सांगितले आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाची सातत्याने होत असलेली घसरण आणि जगाचा रुपयाकडे वाढता कल बघता एक नवीन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यानंतर भारत आपले आयात-निर्यातीचे व्यवहार रुपयात करू शकेल आणि जागतिक व्यापार व्यवस्थेतील डॉलर आणि अमेरिकेचा दबाव संपुष्टात येईल.

‘आरबीआय’ची नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर अमेरिकेसह अन्य पाश्चात्त्य देशांच्या निर्बंधांचा भारतावर असलेला प्रभाव संपुष्टात येईल. अमेरिकेनं कोणत्याही देशावर निर्बंध लादले तर त्याचा फटका भारताला सहन करावा लागतो. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. तणाव निर्माण झाल्याने अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले. तेव्हा भारताला इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे कठीण झाले होते. त्याचप्रमाणे, नुकत्याच झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका, युरोपने रशियावर निर्बंध लादले तेव्हा भारतीय कंपन्या रशियन उत्पादने खरेदी करण्यात अपयशी ठरल्या. जागतिक बाजारपेठेत व्यापाराचे व्यवहार डॉलरमध्ये होतात; पण निर्बंधांमुळे अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार बंद झाले. त्यामुळे या निर्बंधांचा भारतावर सर्वाधिक परिणाम झाला. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आरबीआय जागतिक बाजारपेठेत थेट रुपयामध्ये व्यवहार करण्याची प्रणाली तयार करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in