अमेरिकेतील भारतीय दूतावासावरील हल्ल्यांची चौकशी ;पंजाब व हरयाणात १४ ठिकाणी एनआयएचे छापे

एनआयएच्या एका पथकाने ऑगस्ट २०२३ मध्ये वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यांच्या घटनांच्या चौकशीसाठी सॅन फ्रान्सिस्कोला भेट दिली होती.
Published on

नवी दिल्ली : अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यासंबंधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी पंजाब व हरयाणात १४ ठिकाणी छापे मारले.

या संबंधात अधिक माहिती देताना एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, १९ मार्च आणि २ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी उत्तर भारतात हे छापे टाकण्यात आले होते. ज्यामध्ये गुन्हेगारी घुसखोरी, तोडफोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आणि इमारतीला आग लावण्याचा प्रयत्न होता. जाळपोळ करून आग आदी कारवायांसंबंधात चौकशी केली जात आहे.

एनआयएने पंजाबमधील मोगा, जालंधर, लुधियाना, गुरुदासपूर, मोहाली, पटियाला आणि हरियाणातील कुरुक्षेत्र आणि यमुनानगर या जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. प्रवक्त्याने सांगितले की, या कारवाईमध्ये आरोपींशी संबंधित माहिती असलेला डिजिटल डेटा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली. हल्लेखोरांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर खटला चालवणे आणि अशा भारतविरोधी घटकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्याने दिली.

एनआयएच्या एका पथकाने ऑगस्ट २०२३ मध्ये वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यांच्या घटनांच्या चौकशीसाठी सॅन फ्रान्सिस्कोला भेट दिली होती. त्याच्या तपासाचा एक भाग म्हणून, एनआयएने या हिंसक घटनांमध्ये सहभागी असलेल्या यूएस-आधारित संस्था आणि व्यक्तींची माहिती ओळखण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी माहिती जमा केली.

logo
marathi.freepressjournal.in