राम मंदिराच्या उद‌्घाटनाचे अडवाणी, जोशींना निमंत्रण

विहिंपचे नेते आलोक कुमार म्हणाले की, अडवाणी व जोशी यांना २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले आहे
राम मंदिराच्या उद‌्घाटनाचे अडवाणी, जोशींना निमंत्रण
PM
Published on

नवी दिल्ली : देशात राम मंदिरासाठी आंदोलनाचा झंझावात निर्माण करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते

लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद‌्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेने हे निमंत्रण दिले आहे. यावेळी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार उपस्थित होते. अडवाणी यांना संघाचे दोन मोठे नेते कृष्णगोपाल व रामलाल यांनी आमंत्रण सोपवले. यावेळी अडवाणी यांची मुलगी प्रतिभा उपस्थित होती.

विहिंपचे नेते आलोक कुमार म्हणाले की, अडवाणी व जोशी यांना २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही या कार्यक्रमाला येण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिले. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सोमवारी अडवाणी व जोशी यांना आपले वय पाहता कार्यक्रमाला येऊ नये, असे म्हटले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राम मंदिराच्या उद‌्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले. आता या कार्यक्रमाला अडवाणी, जोशी जातात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राम मंदिर आंदोलनात लालकृष्ण अडवाणी हे अग्रणी नेते होते. त्यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली होती.

logo
marathi.freepressjournal.in